भुसावळात नूतन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची भेट ; कामकाजाचा घेतला आढावा
भुसावळ- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी शेतकर्यांच्या याद्या तत्काळ संगणकावर अपलोड कराव्यात तसेच दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात खरीप हंगामातील अनुदान जमा करण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सोमवारी भुसावळ भेटीप्रसंगी दिले. अचानक जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या भेटीनंतर कर्मचार्यांमध्ये धावपळ उडाली. प्रसंगी जिल्हाधिकार्यांनी ईव्हीएम मशीनची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.
कामचुकारपणा केल्यास खबरदार
प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याशी जिल्हाधिकार्यांनी संवाद साधून कामांची माहिती जाणून घेतली. कामचुकारपणा करणार्या कर्मचार्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भुसावळ तहसील आवारातील शासकीय गोदामातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राची त्यांनी पाहणी केली. डॉ.ढाकणे हे वाहनात बसत असताना एका महिलेने अन्न सुरक्षा योजनेत नाव असतानाही धान्य मिळत नसल्याची तक्रार केल्याने पुरवठा विभागाला दखल घेण्यासह संबंधित दुकानदारावर कारवाईची सूचनाही त्यांनी केली.