खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन; आर्थिक मदत करणार्या कंपन्यांचा सन्मान
पुणे : जिल्ह्याला आतापासून दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्यांसह इतर मदत करण्यासाठी औद्योगिक कंपन्यांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील शाळांसह विविध उपक्रमांना आर्थिक मदत करणार्या कंपन्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, महिला व बाल कल्याण सभापती राणी शेळके, कृषी विभागाच्या सभापती सुजाता पवार, समाजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे यावेळी उपस्थित होत्या.
सुळे म्हणाल्या, राज्य व केंद्र सरकारच्या यादीत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून पुण्याला लौकिक मिळाला आहे. जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक अंगणवाड्यांना 31 डिसेंबरपर्यंत वीज मिळणार आहे. कंपन्यांमुळे त्यांचा विकास होत आहे. पाणी, वीजचे सुविधा मिळाल्याने त्यांची रचनाच बदलून गेली आहे. राज्य व केंद्र सरकारची मदत सर्वच ठिकाणी पोहोचणे अशक्य आहे. त्यावेळी कंपन्यांची मदत त्या भागात पोहोचल्यास विकास निश्चित होऊ शकेल.