पुणे विभागासाठी 206 कोटी : प्रताप जाधव यांची माहिती
पुणे : राज्यातील 2018च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने पुणे विभागासाठी बाधित शेतकर्यांना वाटपासाठी पहिला हप्ता म्हणून 206 कोटी प्राप्त झाले असून त्याचे वाटपही सुरू झाले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी 53 कोटी 23 लाखांचा निधी आला आहे, अशी माहिती विभागीय उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव यांनी दिली.
पुणे विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा वगळता सदर मदत पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी आहे. या चार जिल्ह्यांसाठी प्रत्यक्षात 1,009 कोटींची मागणी केली होती. मात्र, शासनाकडून पहिल्या हप्त्या पोटी 206 कोटी प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी 53 कोटी 23 लाख, सोलापूर नऊ तालुके 97 कोटी 59 लाख, सातारा 3 तालुके 21 कोटी 36 लाख, तर सांगली 5 तालुके 34 कोटी 40 लाख निधी वाटपास सुरुवात केली आहे.
तहसिलदारांमार्फत निधीचे वाटप पुणे जिल्ह्यातील निधी वाटपाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले, जिल्ह्यासाठी 106 कोटी 47 लाख रुपये निधीची मागणी केली होती. शासनाकडून पहिला हप्ता म्हणून 53 कोटी 23 लाख प्राप्त झाले आहेत. तहसिलदारांमार्फत निधी वाटपास सुरुवातही झाली असून नेमके किती लाभार्थी आहेत याची माहिती दररोज घेतली जाणार आहे. ज्याठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तेथे निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावरच निधीचे वाटप केले जाईल.