गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवडीच्या क्षेत्रात 60 टक्क्यांनी घट
गहू, ज्वारी आणि मक्याच्या क्षेत्रातही लागवड कमी, चार्याचा प्रश्नही गंभीर
पुणे : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामाला बसला आहे. यावर्षी पाण्याअभावी जवळपास पूर्ण हंगाम वाया गेला आहे. आतापर्यंत 92 हजार 208 हेक्टरवरील म्हणजेच केवळ 24 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवडीच्या क्षेत्रात 60 टक्क्यांनी घट झाली आहे. गहू, ज्वारी आणि मक्याच्या क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. यामुळे चार्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
या वर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. तुरळक पावसामुळे पिकांना पाहिजे तसा फायदा झाला नाही. ढगाळ हवामानाचाही या पिकांना फटका बसला. यामुळे हातातोंडाशी आलेले पीकही शेतकर्यांना मिळाले नाही.
रब्बी कडधान्याच्या लागवडीतही यावर्षी मोठी घट
या वर्षी ज्वारीचे सरासरी पेरणीक्षेत्र 1 लाख 57 हजार 814 हेक्टर येवढे होते. मात्र, केवळ 64 हजार 38 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या लागवडीत जवळपास 59 टक्क्यांनी घट झाली आहे. गव्हाचे सरासरी पेरणीक्षेत्र 47 हजार 971 हेक्टर होते. या पैकी केवळ 6 हजार 4 हेक्टरवर गव्हाच्या पेरण्या झाल्या. रब्बी तृणधान्य पिकांचे क्षेत्र जवळपास 2 लाख 24 हजार 849 हेक्टर होते. मात्र, केवळ 78 हजार 366 हेक्टरवर पेरण्या झाल्या. रब्बी कडधान्याच्या लागवडीतही यावर्षी मोठी घट झाली आहे. यामुळे एकंदर हा हंगामच शेतकर्यांचा वाया गेल्याने हे वर्ष काढायचे कसे; असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चार्याबरोबर भाजीपालाचेही नुकसान
यावर्षी रब्बी हंगामातील चारा पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी 29 हजार 479 हेक्टरवर चारापिके लावण्यात आली होती. मात्र, यावर्षी 22 हजार 306 हेक्टवर चारापिके लावण्यात आली. चारा पिकांबरोबरच भाजीपाला पिकांचे क्षेत्रही गेल्या वर्षीच्या तुलनेत 43 टक्यांनी घटली आहे. मसाला पिकांचेही क्षेत्र 50 टक्क्यांनी घटले आहे.
41 टक्क्यांनी ऊस लागवडीत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट
कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. या वर्षी रब्बीच्या कांदा लागवडीच्या क्षेत्रातही घट झाली आहे. गेल्या वर्षी 50 हजार 572 हेक्टरवर कांदा लागवडी झाल्या होत्या. यावर्षी 26 हजार 972 हेक्टरवर कांदा लागवडी झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदालागवडीत 19 टक्कांनी घट झाली आहे. रब्बी हंगामातील ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र 1 लाख 30 हजार 630 हेक्टर एवढे होते. गेल्या वर्षी 92 हजार 114 हेक्टरवरील ऊस लागवडी पूर्ण झाल्या होत्या. मात्र यावर्षी 29 टक्के म्हणजेच 38 हजार 11 हेक्टर क्षेत्रावरील पूर्ण झाल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत 41 टक्क्यांनी ऊस लागवडीत घट झाली आहे.