दुष्काळामुळे पारंपारिक शेवंतीच्या उत्पादनात घट

0

पुणे । पुणे जिल्ह्यात गेली दोन-तीन वर्षे शेतकर्‍यांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या दुष्काळी स्थितीमुळे यंदा पारंपारिक शेवंतीचे उत्पादन धोक्यात आले असून उत्पादनात 50 टक्क्यांनी घट झाली आहे. शेतकर्‍यांनी कमी पाण्यावर येणार्‍या इतर शेवंतीची लागवड केल्याने पारंपारीक शेवंतीचे उत्पादन घटले आहे.
दरवर्षी पारंपारिक राजा शेवंतीची लागवड ही एप्रिल आणि मे महिन्यात केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून पाउस कमी झाला. त्यामुळे या फुलांची लागवड कमी झाली आहे. ही लागवड केलेल्या शेवंतीची दसर्‍याच्या दरम्यान आवक होते़ मात्र यंदा ती खूप कमी प्रमाणात होणार आहे.

250 रुपये किलोचा भाव
कमी पाण्यावर उत्पादीत होणार्‍या भाग्यश्री शेवंतीच्या लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. तसेच पेपर व्हाईट शेवंती, बत्तास शेवंती, मेरी गोल्ड, गोल्डन आदी प्रकारच्या शेवंतीची शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. या फुलांची विक्री 150 ते 250 रुपये प्रतिकिलोने केली जात आहे. तर पारंपारिक फुलांना 100 ते 125 रुपये प्रतिकिलोस दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. नवीन प्रकारच्या फुलांचे उत्पादन आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या परिसरात मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. तेथून याबाबतची माहिती घेऊन आम्हीही या फुलांचे उत्पादन घेतले, असे यवत येथील शेतकरी विनायक शितोळे यांनी सांगितले.

प्लॉस्टिकच्या फुलांवर बंदी घाला
सध्या गणेशोत्सव असल्याने सर्वच प्रकारच्या फुलांना मागणी असते. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत ती कमी आहे. सध्या प्लास्टिकची फुले बाजारात विक्रीस असल्याने सर्वसाधारण फुलांना मागणी घटली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे़ प्लॉस्टिकच्या फुलांवर शासनाने बंदी घालावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे.

नवीन प्रकारच्या फुलांना मागणी
यंदा आम्ही पारंपारिक शेवंतीचे उत्पादन घेतले नाही. सध्या बाजारात शेवंतीच्या नवीन प्रकारांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही उत्पादन घेण्याचे ठरवले ओह. हे उत्पादन घेताना काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र बदलत्या काळानुसार उत्पादनात बदल करत आहोत.
– तात्या दोरगे, शेतकरी