‘पानी फाउंडेशन’मुळे ग्रामस्थांना गाव पाणीदार करण्याची मिळाली संधी
शरद भालेराव, जळगाव : राज्यातील दुष्काळावर कसा मार्ग काढावा, याबद्दल म्हणावे तसे अद्यापही यश मिळालेले दिसत नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडे असलेला इच्छाशक्तीचा अभाव, तज्ज्ञांच्या इशार्यांकडे होणारे दुर्लक्ष, वारेमाप उधळपट्टी आणि बेपर्वा अशा वृत्तीमुळे दुष्काळाचे संकट गडद होत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मुळात गावागावांमध्ये होणारी एक निराळी स्पर्धा आहे. स्पर्धेच्या ठराविक कालावधीत कोणते गाव पाणलोट व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे सर्वाधिक काम करू शकते, हे पाहणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. ‘पानी फाउंडेशन’ देत असलेल्या प्रशिक्षणाद्वारे मिळालेले ज्ञान वापरून स्वत:चे गाव पाणीदार करण्याची संधी यानिमित्त ग्रामस्थांना मिळू लागली आहे.
दुष्काळाला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण
ना-नफा तत्त्वावर 2016 मध्ये ‘पानी फाउंडेशन’ ही संस्था स्थापन झाली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा, यासाठी ‘सत्यमेव जयते’ ह्या टीव्ही मालिकेतील टीमने पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी लोकांनीच प्रयत्न करण्याची गरज त्यांना वाटली. म्हणूनच, दुष्काळाला पळवून लावण्यासाठी ह्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षित करण्यासाठी संवादाचे माध्यम पुरविणे, हे ‘पानी फाउंडेशन’चे लक्ष्य आहे. पानी फाउंडेशन सध्या जलसंधारण (शास्त्रशुद्ध पाणलोट व्यवस्थापन), नेतृत्वगुण आणि समाजबांधणी/संघटन या विषयावर प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्रातील जवळपास 90 टक्के दुष्काळी भागात ‘पानी फाउंडेशन’चे काम सुरू आहे. प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाविषयी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामस्थांना दिलेली प्रेरणा म्हणून 2016 यावर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेची निर्मिती झाली. 2019 या वर्षातली वॉटर कप स्पर्धा 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत घेण्यात येईल.
यंदाच्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 4 तालुक्यांचा समावेश
ग्रामीण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये दरवर्षी दुष्काळाचे सावट असते. परिणामी हजारो गावे त्यात होरपळली जातात. तिथले जनजीवन विस्कळीत होते. हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, हिवरे यासारख्या काही गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी एकजूट आणि श्रमाच्या बळावर ‘पाणी’ या समस्येवर उपाय शोधून काढला. ग्रामस्थांना दुष्काळाशी लढा देण्यासाठी सक्षम आणि सक्रीय करण्याच्या हेतूने पानी फाउंडेशनने संवादाचे प्रभावी माध्यम बनून लोकजागराची मोहीम सुरू केली.
राज्यात 355 तालुके आहेत. या सर्व तालुक्यांमध्ये मिळून 43 हजार 665 गावे आहेत. पहिल्यावर्षी 3 तालुके, दुसर्यावर्षी 30 तालुके, तिसर्यावर्षी 75 तालुके आणि यंदा चौथ्यावर्षी ही स्पर्धा तब्बल 76 तालुक्यांमध्ये पोहोचली आहे. या जलचळवळीत सहभागी होण्याचे आमंत्रण देत सगळेच एका मोठ्या जलक्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी पानी फाउंडेशनचे संस्थापक तथा अभिनेता आमिर खान यांनी आवाहन केले आहे.
गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातील पारोळा आणि अमळनेर या दोन तालुक्यांचा समावेश होता. या दोन्ही तालुक्यात स्पर्धेतील काही निवडक गावांमध्ये चांगले काम झाले. त्यात अमळनेर तालुक्यातील जवखेडे आणि नगाव गावात उत्कृष्ट काम झाले. तसेच पारोळा तालुक्यातील चोरवडमध्ये विहिरींच्या पाण्याची पातळी वाढून गावे पाणीदार झाली. यंदाच्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 4 तालुक्यांचा समावेश आहे. त्यात जामनेर, चाळीसगाव, अमळनेर आणि पारोळा तालुक्याचा समावेश आहे.
रणरणत्या उन्हात ग्रामस्थांचे श्रमदान
4 तालुक्यातील 280 गावांनी पाणी फाउंडेशनचे 4 दिवसीय निवासी प्रशिक्षण घेतले आहे. जामनेर तालुक्यातील सर्वात जास्त म्हणजे 90 गावांनी प्रशिक्षण केले आहे. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल ते 22 मे असा आहे. ग्रामस्थांनी 8 तारखेची वाट न पाहता 7 तारखेला रात्री बारा वाजेच्या ठोक्याबरोबर स्पर्धेची दमदार सुरवात केली. त्या दिवशी जळगावमधील 85 गावांनी रात्री श्रमदानाला सुरवात करून 1 सेकंदही वाया जाणार नाही, याची काळजी घेतली. आजमितीला 4 तालुक्यातील अंदाजे 150 गावे या रणरणत्या उन्हात श्रमदान करीत असल्याचे चित्र आहे. जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री गावाने स्पर्धेची सुरवात अनोख्या पद्धतीने केली. तसेच जामनेरमधील टाकळी बु. गावाने मशाल फेरी काढून स्पर्धेची सुरवात केली.
चिमुकल्याची पर्वा न करता मातेचेही श्रमदान
जामनेर तालुक्यातील परिस्थिती फार वाईट आहे. तालुक्यातील गावांनीही दुष्काळाशी लढायला कंबर कसली आहे. तालुक्यातील चिंचोली पिंप्री या गावाने रोज 45 दिवस श्रमदान करण्याचे ठरविले आहे. श्रमदानाला रोज 500 लोक येतात. त्यातच फातिमा बबन तडवी (22) या महिलेने 46 डिग्रीच्या तापमानात आपल्या 3 महिन्याच्या चिमुकल्याला श्रमदानाला घेऊन आली. रणरणत्या उन्हात तिने 2 तास आपल्या चिमुकल्याची पर्वा न करता श्रमदान करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यामुळे या महिलेची ही जिद्द पाहून इतर महिलाही सरसावल्या. हे पाहून काहींचे डोळेही पाणावले होते. त्या ठिकाणी 2 तास श्रमदान केले. गावातील इतर महिला, पुरुष श्रमदानाला येत होती. चिमुकल्याला श्रमदानाला घेऊन आल्याचे पाहून सरपंच विनोद चौधरी यांनी झाडाला पाळणा बांधून चिमुकल्याचा 2 तास सांभाळ केला. यावेळी या बांधावर एक वेगळाच प्रत्यय अनुभवास आला.
जामनेर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा सहभाग
सत्यमेव जयते वॉटर कपला हाणून पाडण्यासाठी जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री गावाने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून 7 एप्रिलला गावातील प्रत्येक घराला पाणी फाउंडेशनचा लोगो असणारी नेम प्लेट दिली. सोबतच सरपंचांनी गावातील सर्वांना श्रमदानाला येण्याचे आवाहन केले होते. श्रमदानात तालुक्यातील सावरखेडा, नांद्रा प्रलो, चिंचखेडा त.वा., रोटवद, लोंढरी बु., टाकळी बु., मोरड, बेटावद बु., जोगलखेडा, लाखोली, नाचणखेडा, भिलखेडा, सोनाळे, मांडवे बु.,डोहरी तांडा, गोरनाळे, कुंभारी बु., जंगीपुरा आदी गावांचाही समावेश आहे.
विविध उपक्रम राबवत भर उन्हासह रात्रीही ग्रामस्थांचे श्रमदान
स्पर्धेत जामनेर तालुक्यातील टाकळी बु. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या निसर्गाची धमाल शाळा या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी श्रमदानात सहभाग नोंदवला. यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सकाळी श्रमदान करुन खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. 30 विद्यार्थ्यांसह 7 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होऊन स्वयंप्रेरणेने श्रमदान केले.
गाडेगावला उद्घाटन करुन अधिकार्यांचे श्रमदान
जामनेर तालुक्यातील आदर्श गाव गाडेगाव येथे पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या उद्घाटनावेळी पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी ठाकुर, नेरीचे मंडळ कृषी अधिकारी बाविस्कर, सर्व कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मंडळींनी श्रमदान सुरु केले.
रोटवदला 500 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग
रोटवद गावातही कामाला जोरदार सुरुवात होऊन अबालवृद्धांपर्यंत सर्व जण उत्सुकतेने कामाला लागल्याचे चित्र होते. जवळपास 500 पेक्षा जास्त लोक श्रमदानासाठी येत आहेत.
सवतखेडाला रात्री कीर्तन, भजनासह श्रमदान
सवतखेडा येथे प्रत्येकाला पाणी फाउंडेशनची टी शर्ट देऊन सुरवात करुन कीर्तनासह भजनाने रात्री 12 वाजता श्रमदान करण्यात आले.
अभोणे गावाने साजरा केला आगळावेगळा सोहळा
चाळीसगाव तालुक्यातील अभोणे गावातील 79 वर्षाच्या म्हातारी जमना आजी, गावातील सर्व महिलांना एकत्र करून, बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा आणि वाद्य वाजवून, गाणे गात संपूर्ण गावात फेरी काढली. गावातील सर्व लहान मुलींपासून तर म्हातार्या आजीपर्यंत केवळ महिलांना एकत्र करून महिलांपासून श्रमदानाची 7 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता सुरुवात केली. असा आगळावेगळा सोहळा संपूर्ण गावाने साजरा केला.
वरखेडला अपंग दाम्पत्यांनी तयार केला शोषखड्डा
चाळीसगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुकला 7 एप्रिल रोजी रात्री श्रमदानाला सुरुवात केली. गावातीलच कैलास कावरे आणि माधवी कावरे या अपंग दाम्पत्यांनी आपले गाव पाणीदार करण्यासाठी अपंगत्वाचा विचार न करता शोषखड्डा तयार केला. त्याच दाम्पत्यांची म्हणजेच वीर जलयोध्यांची, गावात वाजत-गाजत मिरवणूक काढली. गावातील भागवत सप्ताह पारायणतील सर्व टाळकरी व महाराज गण, आणि संपूर्ण गावाने एकत्र येऊन श्रमदानास सुरुवात केली.
बोढरेला तीन युवकांमुळे एकवटली नारी शक्ती
‘काम करत रहा बदल नक्कीच होईल’, असे चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावातील 3 युवकांनी सुरू केलेल्या श्रमदानाच्या चळवळीला 16 युवक जोडले. ते करत असलेल्या कामाला चाळीसगाव टिमने भेट दिली. बोढरे गावातील महिलांना भावनिक आवाहन करुन महिलांना पाण्यासंदर्भात होणार्या त्रासाची जाणीव करून दिली. त्यानंतर सकाळीच बोढरे गावातील 30 महिला गावाजवळ असणार्या सिमेंट नाल्यातील गाळ श्रमदानातून काढण्यास उतरल्या. या नारी शक्तीमुळे चळवळ आणखीनच बळकट झाली. त्या 30 महिलांनी रोज 2 तास श्रमदान करण्याचे ठरविले आहे.
पारोळा तालुक्यात महिलांचा सहभाग उल्लेखनीय
पारोळा तालुक्यात धुळपिंप्री, दगडी सबगव्हाण, ढोली, चोरवड, मोंढाळे प्रअ, चिखलोड खु, बाभळेनाग, रताळे, मुंदाणे प्रअ, कराडी, टोळी, शिरसमणी, टिटवी, चहुत्रे, मंगरूळ, कामतवाडी, पोपटनगर, भोंडणदिगर, विटनेर, सांगवी, कन्हेरे, खेडीढोक, तरवाडे खु, शेवगे बु. या गावांचा समावेश आहे. गरोदर मातांसह महिला बचत गटांच्या महिलांचा सहभाग उल्लेखनिय ठरला आहे.
अमळनेर तालुक्यात 30 गावे ठरली अग्रेसर
पानी फाउंडेशन आयोजित स्पर्धेसाठी 7 एप्रिलच्या मध्यरात्री दुष्काळा विरुद्धच्या महायुद्धाला सुरवात झाली आहे. अमळनेर तालुक्यातील 153 पैकी 58 गावांचा सहभाग असून 30 गावे अग्रेसर ठरली आहेत. त्यात आनोरे, निंब, मंगरुळ, चौबारी, शहापूर, कोंढावळ, रणाईचे, आर्डी, दोधवद, हिंगोणेसिम, हेडावे, महेरगाव, नगाव खुर्द, पातोंडा, दहिवद या गावांचा समावेश आहे.
आनोरे गावात निघाली मशाल फेरी
अमळनेर तालुक्यातील आनोरे गावात रात्री 8 पासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भजनाच्या ताल मृदुंगाच्या आवाजाने रात्री सारे गाव पेटून उठले. 11.30 च्या सुमारास घोडा आणि बैलगाडी व गावातील सर्व महिला पुरुष यांच्या माध्यमातून मशाल फेरी काढण्यात आली. आणि गटविकास अधिकारी अजय नष्टे यांच्या माध्यमातून कामास सुरवात करून गावाने जल्लोषात
कामाची सुरुवात केली.
जामनेर तालुक्यातील दोन गावांना प्रत्येकी 1 लाखाची रक्कम
जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री आणि चिंचखेडा तवा या दोन गावांना जलसंधारणाच्या कामासाठी लकी ड्रॉद्वारे प्रोत्साहनपर म्हणून प्रत्येकी 1 लाख देण्यात आले. अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेच्या माध्यमातून अमीर खान आणि किरण राव यांच्या हस्ते ही रक्कम देण्यात आली. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या पत्नी तथा जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनीही आपल्या प्रिया आणि श्रेया या दोन्ही मुलींसह सहभाग घेवून गावोगावी जावून स्वतः श्रमदान करीत आहे. यासोबतच कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचेही श्रमदानासाठी करीत असलेले कार्य उल्लेखनिय ठरत आहे.
चार तालुक्यातील 293 गावे सहभागी
स्पर्धेत जामनेर तालुक्यातील 160 पैकी 90 गावांनी सहभाग घेतला आहे. त्यात 46 गावात प्रत्यक्ष काम सुरु आहे. तसेच 20 गावे राज्यस्तरावरचे श्रमदान करीत आहे तर 30 पेक्षा जास्त गावे तालुक्यात अव्वल येण्यासाठी काम करीत आहे. या कार्यात साडे नऊ हजार ग्रामस्थ श्रमदान करीत असून सामाजिक संस्था, भूमीपुत्रांचे योगदान मिळत आहे. पारोळा तालुक्यातील 113 पैकी 75 गावांनी सहभाग घेतला असून 23 गावात प्रत्यक्ष काम सुरु आहे. अमळनेर तालुक्यातील 153 पैकी 58 गावांचा सहभाग असून 30 गावे अग्रेसर ठरली आहेत. चाळीसगाव तालुक्यातील 143 पैकी 70 गावे सहभागी झाली असून 36 गावांमध्ये प्रत्यक्ष कामे सुरु आहेत. 1 मे रोजी होणार्या महाश्रमदानाचीही जय्यत तयारी झाली असून त्यात अनेकांनी सहभाग दर्शविला आहे.
1 मे रोजी 4 गावांमध्ये ‘महाश्रमदान’
जिल्ह्यातील चारही तालुक्यातील निवड झालेल्या प्रत्येकी एका गावात 1 मे रोजी महाश्रमदानाचे आयोजन केले आहे. त्यात सहभागासाठी अनेकांनी ऑनलाईन नोंद केली आहे. त्यात जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री, अमळनेरातील निंब, चाळीसगावातील आभोणे तर पारोळा तालुक्यातील मुंडाळे प्र.अ. या 4 गावांचा समावेश आहे.
तालुका समन्वयकांचे कार्यही ठरले उल्लेखनीय
यंदाच्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चाळीसगाव, अमळनेर आणि पारोळा तालुक्याचा समावेश आहे. त्यासाठी जामनेरला अश्विन राजपूत, सुनील धुरडे, पारोळा येथे निलेश राणे, प्रशांत अवसरमोल, चाळीसगावला विजय कोळी, सुनील पाटील तर अमळनेरला अप्पा पाटील अशा तालुका समन्वयकांची नियुक्ती केली आहे.
280 गावांना श्रमदानाची त्सुनामी लाट
पाणी फाउंडेशन केवळ माध्यम असून लोकांच्या मनातील सुप्त शक्तीला बळ देण्याचे काम करीत आहे. जळगाव जिल्ह्यातील 280 गावामध्ये श्रमदानाची त्सुनामी लाट आली आहे. त्याचे खरे श्रेय श्रमकरी, कष्टकर्यांना आहे. त्यांनी उन्हातानाची पर्वा न करता गाव पाणीदार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी श्रमदानाच्या सेवेत अहोरात्र उपलब्ध असणार आहे. ‘बोलो मिलकर एक साथ, दुष्काळाशी दोन हाथ’, असे म्हणत जळगाव दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व मिळून श्रमदान करीत आहे.
-विकास गायकवाड, जिल्हा समन्वयक
क