नंदुरबार । दुष्काळाची दाहकता सोसत पाण्यासाठी भटकंती करणार्या उमर्देकरांनी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या मदतीने दुष्काळ दूर करुन पाणी जिरविण्याचा संकल्प करीत शेकडो हात श्रमदानासाठी कामाला लागले आहेत. नंदुरबार तालुक्यातील अवघ्या सहा कि.मी. असलेले उमर्दे खुर्दे येथे गेल्या एक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी गावकर्यांना भटकंती करावी लागत आहे. तलाव, नद्या गेल्या 4 ते 5 वर्षांपासून कोरड्या आहेत. उमर्दे गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याच्या तयारीत होते.
दुष्काळाशी दोन हात
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गावातील पाच युवक सरसावले. त्यांनी पाणी फाऊंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यांनी बारीपाडा येथे जाऊन पाच दिवसीय प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी गावातील नागरीकांशी चर्चा केली. वॉटप कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार येथील गावांचा या स्पर्धेमध्ये सहभाग आहे. उमर्देगावातील 5 तरुणांनी सुरु केलेल्या कामांना गावातील शेकडो हातांनी श्रमदान केले. गावाला दुष्काळातून बाहेर काढून गाव पाणीदार करण्याचा संकल्प करीत ग्रामस्थ, अबालवृद्ध, बालक, विद्यार्थी यांनी श्रमदान केले.गावात वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी गावातील तरुणांनी नर्सरीची निर्मिती केली. त्यात दोन हजारांच्यावर रोपे तयार केली. त्यातील काही रोपे श्रमदान करुन गावाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. उमर्दे गावातील अजय भिका ठाकरे, वेडू बोराडे, मल्हारी पाटील, कमलेश चौधरी, नामदेव पेटकर या पाच युवकांनी सुरु केलेल्या चळवळीला गावातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळते आहे.