दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्ताची वाट का बघताय ? – अजित पवार

0

पुणे : राज्यात यंदा बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे .त्यामुळे शेतकरी अडचणीत  आहे. मात्र, भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करू असे सांगतात. दुष्काळ जाहीर करण्यासाठी चंद्रकांत पाटील हे मुहूर्ताची वाट का बघतायेत, अशा शब्दांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

राज्यसरकारने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील नेहरू मेमोरियल हॉल ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी अजित पवार म्हणाले की,देशातील अनेक राज्यांनी दुष्काळ जाहीर केला असताना, हे सरकार एवढा वेळ का लावत आहे ? यातून या सरकारची मानसिकता दिसत आहे. यंदा भूजल पातळी खाली गेली असून त्यामुळे जलयुक्त शिवाराची कामे कशाप्रकारे झाली असतील हे कळतं. जलयुक्त शिवाराबाबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणारी शिवसेना भाजपावर टीका करतेय. सत्तेमध्ये असून भाजपावर टीका करणे योग्य नाही, भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष राज्यातील परिस्थितीला जबाबदार आहेत. अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालास हमी भाव मिळाला पाहिजे,दूधाला चांगला भाव मिळाला पाहिजे या मागण्यांची दखल सरकारने घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.