उस्मानाबाद – राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे़ तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.
आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मंगळवारी उस्मानाबादेत आले होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले़ ते म्हणाले, आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही आॅक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला़ आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल.