पालघर : महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला आहे परंतु केंद्राने एक रुपयाही राज्याला दिला नाही. याविषयी विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर केंद्राचे पथक पाहणी करण्यासाठी आले, परंतु या पथकाने रात्रीची पाहणी केली.अशी रात्रीची पाहणी कुणी केली होती का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा चौथा दिवस आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील आजच्या सभेलाही जनतेचा प्रतिसाद मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. याच सभेत अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.
अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री जनधन, सुकन्या, मुद्रा, आवास, फसलविमा, ग्रामसिंचन, सुरक्षा, उज्ज्वला, दीनदयाळ, अमृत आहार इतक्या योजना या सरकारने आणल्या परंतु याचा फायदा किती झाला, काय मिळालं जनतेला?असाही सवाल त्यांनी केला. घर आहे पोकळ वासा… वारा जाई फसफसा अशी अवस्था या भाजप सरकारची झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.