संसदेत काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी
पीएनबी घोटाळ्यावरून पंतप्रधानांवर टीका
नवी दिल्ली : मंगळवारी संसदेतील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसने पीएनबी घोटाळ्यावरून घोषणाबाजी करत सताधार्यांना लक्ष्य केले. एक नीरव मोदी आहे, दुसरे मोदी नीरव म्हणजेच शांत आहेत, अशी टीका करण्यात आली. या सगळ्या घोषणाबाजीमुळे आणि गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेला 12 हजार कोटींपेक्षा जास्त चुना लावून दोघेही देशाबाहेर पळाले आहेत. नीरव मोदीला पळवून लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच हात होता. तसेच नोटाबंदीचा निर्णय नीरव मोदीसाठीच घेण्यात आला होता, असे आरोप यापूर्वी काँग्रेसने केले आहेत.
राहुल गांधी यांचीही मोदींवर टीका
मी देशाचा पंतप्रधान म्हणून नाही तर देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून देण्याआधी दिले होते. त्यावरूनही काँग्रेसने घोषणाबाजी केली. मी देशाचा चौकीदार आहे असे पंतप्रधान म्हटले होते. नीरव मोदी पळून जाताना चौकीदार शांत झोपी गेला होता का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच देश का चौकीदार कहाँ गया, सो गया-सो गया अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करत नीरव मोदी, मोदी नीरव, एक नीरव मोदी है, दुसरा मोदी नीरव है! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी मेघालयातील सत्ता स्थापनेवरूनही भाजपवर निशाणा साधला होता. संधीसाधू लोकांसोबत युती करत भाजपने जनमताचा अपमान केला अशा आशयाचा ट्विट राहुल गांधी यांनी केला होता. तसेच पैशाच्या बळावर भाजपने सत्ता काबीज केली असेही ट्विट त्यांनी केले होते.