दुसरी बाजूही असते

0

निवडणूक लढवताना डोनाल्ड ट्रम्प जितके वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते, तितकेच आजही आहे. ट्रम्प निवडून येण्याच्या आधीपासून विरुद्ध वातावरण होते. साहजिकच ते निवडूनच येणार नसल्याची खात्री असलेल्या अमेरिकेसह जगभरच्या उदारमतवादी लोकांचा निकालांनी भ्रमनिरास केलेला होता. साहजिकच सत्तेत आल्यापासूनच ट्रम्प यांची टवाळी करण्यापासून टीकेचा भडिमार सुरू आहे. पण स्वभावत: धश्‍चोट असलेले हे गृहस्थ कोणाला दाद द्यायला राजी नाहीत. साहजिकच सतत ते वादाच्या भोवर्‍यात राहिले तर नवल नाही. मात्र, ते सत्तेत येऊन बसल्याने त्यांना आवर घालताना इतरांच्या नाकी दम येत आहे. पण असा माणूस कशामुळे निवडून येतो किंवा लोकांना कशामुळे आकर्षक वाटतो, त्याचाही विचार होण्याची गरज आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक विरुद्ध प्रतिक्रियेला आमंत्रण देणारा असतो. ट्रम्प हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. अमेरिकेत उदारमतवादी लोकांनी आपल्या भूमिकांसाठी जनतेचा पाठिंबा मिळवण्यापेक्षाही थेट सत्तेतल्या लोकांना गाठून आपल्या भूमिका लोकांच्या गळी मारण्याचा अतिरेक केलेला आहे. अशा भूमिकांमुळे दुखावला जाणारा समाज वा लोकसंख्या, मग पर्याय शोधू लागत असते. तो पर्याय चांगलाच असतो याची कोणी हमी देऊ शकत नाही. पण लोकांचे मन अतिरेकामुळे इतके कलुषित झालेले असते, की त्यापेक्षा अन्य काहीही चांगले अशी एक मनोभूमिका तयार होते. ट्रम्पच्या बाबतीत तेच झाले आहे. पण या माणसाचा ठामपणा वा उर्मटपणा कुठून येतो, तेही लक्षात घेतले पाहिजे. हा माणूस पूर्णवेळ राजकारणी नाही वा त्याचे भवितव्य राजकारणावर अवलंबून नाही. म्हणूनच हातातली सत्ता जाईल याचेही भय त्याला सतावत नाही. तो बेधडक कुठलेही निर्णय घेत असतो आणि त्याचे परिणाम त्याला भेडसावत नाहीत. मात्र, जे परिणाम असतील, ते अमेरिकेला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत.

आताही ट्रम्प यांनी प्रथमच परदेसवारी केलेली आहे. त्यांनी पश्‍चिम आशियातील सौदीमध्ये जाऊन विविध मुस्लीम देशांच्या राज्यकर्त्यांच्या एका परिषदेत हजेरी लावली. मग त्यांनी युरोपात धावता दौरा केला. आधीच ट्रम्प यांच्या निवडीने युरोपातील अनेक प्रगत देशांना घाबरून सोडले आहे. कारण उदारमतवादी राजकारणाचा भरणा याच देशांमध्ये आहे आणि तिथेही त्यांच्या अतिरेकामुळे जनमत विचलित झालेले आहे. दीर्घकाळानंतर युरोपच्या अनेक देशांत अतिउजव्या पक्ष व संघटनांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. अशा स्थितीत ट्रम्प तिथे गेले आणि त्यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मागल्या काही दशकांपासून किंवा एकविसाव्या शतकाच्या आरंभापासून पृथ्वीतला्चे पर्यावरण हा जागतिक महत्त्वाचा विषय झाला. त्यातून पॅरिस कराराची निर्मिती झाली. विकासाचा जो धडाका आजवर लावला गेला व त्यातून यांत्रिक व तांत्रिक प्रगतीचे पल्ले गाठले गेले, त्यानेच पर्यावरणाचा विचका करून टाकलेला आहे. पर्यावरण हा जसा आपापल्या देशाचा विषय आहे, तसाच तो एकूण पृथ्वीतलाचाही एकत्रित विषय आहे. त्यामुळेच विविध बाबतीत जागतिक सहमतीला प्राधान्य आहे. कारण भूमी तुकड्यात विभागली जात असली, तरी पृथ्वी भोवतालचे वातावरण विभागता येत नसते. अवकाश वाटून घेता येत नसते. त्याचे बरेवाईट परिणाम सर्वच देशांना व तिथल्या लोकसंख्येला भोगावे लागणार असतात. म्हणूनच अशा विषयात सामूहिक सहमतीला महत्त्व असते. त्यात कोणाला थोडी झीज सोसावी लागते, तर कोणाला त्याचा अतिरिक्त लाभही मिळत असतो. तिथेच आता गडबड झालेली आहे.

पॅरिस करारात प्रगत देशांवर अनेक गोष्टीत अधिक निर्बंध आले, तर मागास देशांना काही जास्तीच्या सवलती मिळाल्या आहेत. त्या अनेकांनी समजून घेण्याची गरज आहे. ट्रम्प त्यालाच धुडकावून बसले आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत देशांनीच जगाला नवनवे शोध व तंत्रज्ञान मिळवून दिले आहे. मानवी प्रगतीमध्ये अमेरिकेचा हिस्सा मोठा आहे. त्यातूनच हा देश श्रीमंत वा प्रगत म्हणून गणला गेलेला आहे. पण म्हणूनच अधिकाधिक तंत्राधिष्ठित असलेल्या या देशाकडून पर्यावरणाची अधिक हानी होत असते. त्याची किंमत त्यांनीच मोजावी अशी अपेक्षा आहे. कारण नव्याने जगाच्या स्पर्धेत आलेल्या लहान व मागास देशांना अजून किरकोळ तांत्रिक साधनेही उपलब्ध झालेली नाहीत. म्हणूनच गरजेपुरती नवी साधने जमा करताना, त्यांना सवलती दिल्या गेल्या आहेत. त्यात समानता असू शकत नाही. तिथे सर्वच देशांना समान निकष वा नियम लावले, तर अशा मागास वा नव्या देशांना मूलभूत गरजांनाही वंचित राहावे लागेल. म्हणून ही वरकरणी दिसणारी विषमता स्वीकारली गेलेली आहे. आधीचे अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामांनी डोळसपणे हा करार स्वीकारला होता. त्याचा फटका अमेरिकेतील काही उद्योग व व्यवसायांना बसला तर नवल नव्हते. पण ती जागतिक गरज होती आणि जगातला मोठा प्रगत देश म्हणून तेवढ्या त्यागाची गरज होती. मात्र, असे करताना त्याही प्रगत देशात मागे पडलेल्या वा दुर्लक्षित राहिलेल्या लोकसंख्येचा विचार आवश्यक आहे. असे करार स्वीकारताना किंवा पुढे करताना, आपली श्रीमंती ओबामांनी वा त्यांच्या पुरस्कर्त्यांनी विचारात घेतली. पण तो वर्ग प्रामुख्याने नागरी वा शहरी भागातला आहे. अमेरिकेची तितकीच मोठी लोकसंख्या शहरापासून दूर ग्रामीण भागातही वसलेली आहे. तुलनेने ती संख्या कमी असेल, पण ती दुर्लक्षित राहिलेली आहे. किंबहुना त्यांनीच गेल्या निवडणुकीत मोठ्या उत्साहात बाहेर पडून ट्रम्प यांना विजयी केलेले आहे.

शहरी व प्रगत लोकसंख्येने या दुर्लक्षित लोकांचा विचार केला असता, तर ट्रम्प निवडून आले नसते, हे विसरता कामा नये. आताही ट्रम्प यांचा तोच पवित्रा आहे.पॅरिस करार मोडून त्या बंधनातून बाहेर पडताना ट्रम्प यांनी बोललेले शब्द विचारात घेण्याची गरज आहे. आपण पॅरिसच्या लोकांमधून निवडून आलेलो नसून, पीट्सबर्ग येथील लोकांचे प्रतिनिधित्व करतो, असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत. त्याचा अर्थ असा, की मला मते देणार्‍यांना पॅरिस करार मान्य नाही आणि त्यांच्या अपेक्षांचा मान राखण्यासाठीच मी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब बौद्धिक पातळीवर हास्यास्पद ठरवता येईल. पण म्हणून त्यातली वस्तुस्थिती संपत नाही. विकास व प्रगतीच्या वाटचालीचे अनेक लाभ घेतलेला समाज आणि त्यापासून दुर्लक्षित राहिलेला समाज, अशी जगाच्या लोकसंख्येची विभागणी झालेली आहे. त्यातली दरी कायम वाढते आहे. या दुर्लक्षित लोकसंख्येला ती विषमता दिसते आणि बोचते आहे. त्या विषमतेला संपवण्याचा प्रयास झाला नाही, तर दुसर्‍या बाजूचा अतिरेक संभवणार आहे. तो कितपत सुसह्य असेल त्याची खात्री देता येत नाही. पर्यावरण जपले पाहिजे. पण त्याची किंमत फक्त दुर्लक्षितांनीच मोजायची आणि सुखवस्तू लाभधारकांनी मौज करायची, अशी विभागणी चालणार नाही, हा यातला सूचक इशारा आहे. त्यासाठी सुटसुटीत शब्द व युक्तिवाद ट्रम्प करू शकत नसतील. पण अशा वंचित व दुर्लक्षितांच्या भावनांचा उद्गार त्यांनी काढला आहे. अमेरिका हा श्रीमंत वा प्रगत देश असला, तरी तिथली मोठी लोकसंख्या आजही गरिबी व दुर्दशेत जगते आहे आणि त्याची कुठलीही फिकीर उदारमतवाद उराशी कवटाळून बसलेल्यांना नाही. ज्यांना आज व उद्याची भ्रांत पडलेली असते, त्यांना पन्नास शंभर वर्षांनी पृथ्वीचा विनाश होण्याचे भय घाबरवू शकत नाही. कारण त्यांना दोनतीन वर्षांनंतरचे भविष्यही धड दिसत नसते. अशा लोकांच्या मतांवर ट्रम्प स्वार झालेले आहेत आणि जितकी अशी लोकसंख्या वाढणार आहे, तितकी ही दुसरी बाजू प्रगत जगाला भेडसावून सोडणार आहे.