चितगाव । ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नाथन लियॉनने 60 धावांमध्ये सहा विकेट्स मिळवल्यामुळे ऑस्टे्रलियाने बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच सात विकेट्सनी विजय मिळवत दोन कसोटी सामन्याची कसोटी मालिका 1-1 अशी अनिर्णीत राखली. चितगावमधील जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बागलादेशाच्या संघाने ऑस्ट्रेलियाला चांगली लढत दिली. पण सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव 157 धावांवर गडगडल्याने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी त्यांना केवळ 86 धावांचे आव्हान देता आले. पाहुण्यासंघाने 15.3 षटकात 3 विकेट्स गमावून 87 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब करत पहिल्या सामन्यातील पराभवाची तीव्रता कमी केली.
ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. बांगलादेशकडून झालेला ऑस्ट्रेलियाचा हा पहिला पराभव होता. आव्हानचा पाठलाग करण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मॅट रेनशॉने 22 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल 25 धावा काढून नाबाद राहिला. मॅक्सवेलने 17 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. एवढे सोपे आव्हान असतानाही बांगलादेशाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या तिघा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.