फैजपूर– मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी थकीत पगाराच्या मागणीसह प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी नववर्षाच्या प्रारंभापासून कारखाना प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे. दुसर्या दिवशीही मागण्यांबाबत कुठलीही दखल घेण्यात न आल्याने उपोषण सुरूच होते.
* अशा आहेत कामगारांच्या मागण्या
कायम कामगारांचे मे 2016 ते सप्टेंबर 2016 पर्यंतचे पाच पगार मिळावेत, हंगामी कायम कामगारांचे 2015 चा 70 टक्के रीटेंशन व जानेवारी 2017 चा एक पगार त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2017 व मार्च 17 चे दोन पगार देण्यात यावे, रोजंदारी व ट्रेनी कामगारांचे देय असलेले पगार त्वरीत करावेत, शासनाचा 15 टक्के पगार वाढीचा 16 महिन्याचा फरक देणे विषयी करारनामा त्वरीत करण्यात यावा, यापुढे प्रत्येक पगार 10 तारखेपर्यंत नियमित करण्यात यावेत अशा कर्मचार्यांच्या मागण्या आहेत.
साखर बाहेर पडू न देण्याचा इशारा
मागण्या मान्य होत नाहीत तोवर साखर, अल्कोहोल कंपोस्ट खत, भुसा, बॉलयर कटिंग राख आदी बाहेर जावू देणार नाही, असा पवित्रा कर्मचार्यांनी घेतला आहे. मसाकाचे राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष गिरीश कोळंबे, उपाध्यक्ष दामोदर कोळंबे, ज्ञानदेव जावळे, जनरल सेकेट्री एकनाथ लोखंडे, युवराज चौधरी, राहुल नेमाडे, योगेश होले, दिलीप कोळी, वसंत पाटील, हेमराज फिरके, गिरीश चौधरी, नंदकिशोर पाटील, सुनील वाघुळदे, तुषार राणे, सतीश बोंडे, राकेश नेमाडे, रवींद्र महाजन व असंख्य कर्मचारी उपोषणात सहभागी झाले आहेत.