दुसर्‍या दिवशी संपाची तीव्रता वाढली

0

धुळे। दुसर्‍या दिवशीही जिल्हाभरात कापडणे, नरडाणा, पिंपळनेर येथे शेतकर्‍यांसह विविध संघटनांनी रास्तारोको करुन सरकारचे लक्ष वेधले. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी आज शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद व कांदेफेक आंदोलन करण्यात आले. माजी आ.प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. संपूर्ण राज्यात शेतकरी तीव्र स्वरुपाची निदर्शने करीत आहेत. 1 जूनपासून आंदोलनाला सुरुवात झाली असून 7 जूनपर्यंत आंदोलन चालणार आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. घंटानाद करुन झोपलेल्या शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर शासनाच्या कृषी धोरणाचा निषेध म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच कांदे फेकण्यात आले. यानंतर प्रशासनाला शेतकरी हिताच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. आंदोलनाप्रसंगी माजी आ. प्रा.शरद पाटील, अतुल सोनवणे, डॉ.माधुरी बाफना, भूपेंद्र लहामगे, छोटू थोरात, संदीप सुर्यवंशी, शरद गोसावी, राजेंद्र पाटील, हेमा हेमाडे यांचेसह महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साक्रीत सत्यशोधकांची निदर्शने
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संपाचा परिणाम दिसून आला. बाजार समितीत शेतकर्‍यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणला नाही. परिणामी, दिवसभरात खरेदी विक्रीचे व्यवहार झाले नाहीत. त्याचबरोबर साक्री येथील आठवडे बाजारातही दररोज होणारा भाजीपाल्याचा लिलाव ठप्प झाला. तसेच सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगीकिशोर ढमाले,सुभाष काकुस्ते, मन्साराम पवार , यशवंत माळचे, वंजी गायकवाड, हिलाल महाजन, दीपक जगताप, रामलाल गवळी, मेरुलाल पवार, करणसिंग कोकणी, रामसिंग गावित, जीवन गावित, निंबाबाई ब्राह्मणो, पवित्राबाई सोनवणो, केवळबाई पवार आदींसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक अतूल तांबे आदींनी बंदोबस्त ठेवला.

कापडण्यात भाजीपाल्याच्या गाड्या रोखल्या
महामार्गावरील कापडणे गावात शेतकर्‍यांनी देवभाणे फाटा येथे भाजी पाल्यांच्या गाड्या अडविल्यात. फळांच्या गाड्याही अडवून फळं रस्त्यांवर फेकल्याने रस्त्यावर आंब्याचा खच पडलेला दिसून आला. अनेक संघटनांनी शेतकरी संपाला पाठींबा दिल्याने संपाला उग्र स्वरुप आले आहे. या आंदोलनामुळे भाजीपाला अणि दुधाची टंचाई निर्माण होणार असून भाववाढ होण्याची शक्यताही कापडणे गावातून वर्तविली जात आहे.

पिंपळनेरात शेतकरी संघटनेचा रास्तारोको
पिंपळनेर येथे शेतकरी संपात सहभागी झालेल्या संघटनांनी रस्त्यावर उतरुन निषेध नोंदविला. तर महामार्गावरुन जाणार्या कांद्याच्या गाड्या अडवून तो रस्त्यावर फेकून निषेध नोंदविण्यात आला. तसेच शहरातील अनेेक दुकाने आज बंद दिसून आली. यावेळी शेतकरी संघटनेचे महेश मराठे, योगेश खैरनार, अभय शिंदे, रिंकू अहिरे, विनोद आघाव, शुभम गांगुर्डे, दिव्येश गांगुर्डे, भगवान वाघ, दादा खैरनार, विनायक कुळकर्णी, प्रविण अहिरे, प्रविण सुर्यवंशी, गजानन आरगडे, भगवान शिंदे आदींनी सहभाग नोंदविला

सोनगीर टोलनाक्याजवळ आंदोलन
सोनगीर । शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी 1 जुनपासून सरकार विरुद्ध संपाचा एल्गार पुकारला आहे. शेतकरी संपाच्या दुसर्‍या दिवशीही शेतकरी वर्गासह विविध संघटना आक्रमक दिसल्या. मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्याजवळ शेतकरी संघटनेने दि 2 रोजी आंदोलन केले. यात परराज्यातुन येणारी भाजीपाला, भुसारमाल आदींच्या चार वाहनासह दुधाचे टँकर आंदोलनकर्त्यांनी परतवून लावले. शेतकरी संपात शेतकरी संघटनेने सकाळी साडेनऊला मुंबई- आग्रा महामार्गावरील सोनगीर टोलनाक्याजवळ आंदोलन केले. त्यावेळी गुजरातहून हैद्राबादकडे जाणारे दूधाचे टँकर संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी परतवले. तसेचमध्य प्रदेश व गुजरातकडून येणारी भूसार व भाजीपाल्याची चार वाहनेदेखील आंदोलकांनी परत पाठविली. शेतकरी संपामुळे नंदूरबार, शहादा, शिंदखेडा व शिरपूरकडून शेतीमालाचे एकही वाहन धुळ्याकडे आले नाही. दरम्यान शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर संपाच्या पाहिल्या दिवशीदेखील कापडणे येथे रस्त्यावर दूध ओतणे, खासगीदूध संघाला कुलूप ठोकणे, रास्ता रोको आंदोलन आदी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, माजी अध्यक्ष आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल, रामकृष्ण पाटील, छगनपाटील, बंडू पाटील, साहेबराव वाघ, अरुण पाटील, जयवंत बोरसे, नारायण माळी, दिलीप पाटील आदींसह परीसरातील व जिल्हाभरातील शेतकरी उपस्थित होते.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सदर टोल नाक्यावर पोलिस यंत्रणाही तैनात होती.

मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा
एक जून पासून शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे तर आता शेतकर्‍यांच्या पाठीमागे सकल मराठा क्रांती मोर्चाही उभा ठाकला असून दि 2 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर समाजाच्यावतीने निदर्शने करण्यात आलीत. शेतकर्‍यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जगाचा पोशिंदा शेतकरी संपावर गेला आहे, ही मोठी शोकांतिका आहे. शेतकरी आत्महत्या सुरुच आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला भाव नाही, कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस यामुळे हवालदिल शेतकर्‍याला पुन्हा स्वाभिमानाने उभा करावयाचा असेल तर शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून शासनाने लवकरात लवकर हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आंदोलनात माजी आ.राजवर्धन कदमबांडे, माजी आ. प्रा.शरद पाटील, सुभाष देवरे, मनोज मोरे, संदीप बेडसे, अतुल सोनवणे, कमलेश देवरे, संदीप पाटोळे, राजूअण्णा बोरसे, डॉ.माधुरी बाफना, रजनीश निंबाळकर, हेमा हेमाडे यांचेसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

नरडाण्यातही तीव्र निषेध!
नरडाणा येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांनी रास्तारोको करुन निषेध नोंदविला. विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते बळवंत बापु सिसोदे, मनसे उपजिल्हाध्यक्ष अनिल सिसोदे, डॉ.जगदीश बोरसे, अमृत सुकदेव भामरे, मराठा सेवा तालुकाध्यक्ष मोहन जाधव, आर.ओ.पाटील, मनोहर सिसोदे, अशोक महाराज, लिलाधर सोनवणे, रामदास वाणी, शांताराम सिसोदे, भालचंद्र पाटील, पांडुरंग मराठे, प्रदीप पाटील, प्रदीप शिंपी, पिरन सिसोदे, राजेंद्र सिसोदे, देवेंद्र सिसोदे, गोविंदा सिसोदे आदी उपस्थित होते.