दुसर्‍या दिवशी 70 उमेदवारी अर्ज दाखल

0

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याला सुरवात ; जात वैधतेसाठी इच्छुकांची धावपळ

जळगाव: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यात गुरूवारी दुसर्‍या दिवशी 70 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तहसील कार्यालयांच्या आवारात निवडणूकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच जात वैधता प्रमाणपत्राच्या पावतीसाठी देखिल इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची दिवसभरात चांगलीच धावपळ झाली. जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याला सुरवात झाली आहे. जळगाव तालुक्यासह जिल्हाभरातून आज 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज सकाळी साडेनऊपासूनच इच्छूकांनी तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निहाय टेबलावर जावून अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गुरूवारी 70 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

तालुकानिहाय दाखल अर्जांची संख्या
जळगाव तालुका – 2, जामनेर 5, धरणगाव 2, एरंडोल 2, पारोळा 3, भुसावळ 7, मुक्ताईनगर 1, बोदवड 14, यावल 0, रावेर 8, अमळनेर 7, चोपडा 3, पाचोरा 6, भडगाव 2 आणि चाळीसगाव 8 असे एकुण 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. जात पडताळणी समिती कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार राज्य निवडणुक आयोग यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषीत केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात मोठया प्रमाणात निवडणुकीस उभे राहू इच्छिणार्‍या उमेदवारांकडुन अर्ज दाखल होत आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची गैरसोय होवू नये, याकरीता 25 ते 27 डिसेंबर, 2020 या शासकीय सुटीच्या दिवशी सकाळी 9.45 ते 6.15 या कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथील कार्यालय उमेदवारांचे अर्ज स्वीकारणेसाठी नियमीत सुरु राहील असे सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.