दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही गोंधळानेच!

0

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी वाया गेल्यानंतर 4 दिवसांच्या सुट्टीनंतर सुरु झालेल्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही गोंधळानेच झाल्याने आजही कामकाज झाले नाही. सर्वपक्षीय सदस्य कर्जमाफीच्या मुद्दयावर आक्रमक पद्धतीने अडून बसल्याने तुरळक कामकाज वगळता काहीही कामकाज होऊ शकले नाही. गोंधळामुळे सुरुवातीला तीनदा स्थगिती दिल्यानंतर शेवटी संपूर्ण दिवसासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

11 वाजता सभागृहाची बैठक सुरु झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराची घोषणा केली. यानंतर विरोधक आणि शिवसेना तसेच भाजपच्या देखील सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरु करत वेलमध्ये उतरायला सुरवात केली. सदस्य वेलमध्ये उतरायच्या आधीच अध्यक्षांनी कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. यानंतर 11.05 वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात पुन्हा अर्ध्यातासासाठी कामकाज तहकूब केले. 12 वाजता मुख्यमंत्री आल्यानंतर शोकप्रस्ताव मांडला गेला. महाडचे माजी आ. चंद्रकांत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर लगेच सदस्यांनी पुन्हा गोंधळ सुरु केला. या गोंधळात पुरवणी मागण्या तसेच काही विधेयके मंजूर करण्यात आली. गोंधळ वाढत चालल्याने 12.12 मिनिटांनी सभागृह पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर पुन्हा सुरु झाल्यावर काही विधेयके विचारात घेतली गेली तसेच ना. तावडे यांनी एक निवेदन मांडले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने आणि सदस्य अधिक आक्रमक झाल्याने शेवटी 12.38 वाजता सभागृह संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सभागृहाबाहेर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कामकाज सुरु होण्याच्या आधी अर्धा तास पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडक वर पाय, मोदी सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय, कृषिमंत्री हाय हाय, शेतकरी कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारची घोषणाबाजी सभागृहाच्या पायऱ्यांवर करण्यात आली. यावेळी निषेधाचे फलक घेऊन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील,राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. शिवसेनेच्या सदस्यांनी मात्र आज सभागृहाबाहेर निदर्शने टाळत सभागृहातच आवाज वाढवलेला दिसला.