मुंबई : १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्या १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. काल सायंकाळी थंडावल्या. १ कोटी ५४ लाख मतदार उद्या गुरुवारी मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात सहा विद्यमान खासदार पुन्हा आपले भाग्य अजमावित आहेत. एकूण १६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. उद्या होणाऱ्या मतदानात दोन माजी मुख्यमंत्र्यांची कसोटी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरातून तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमधून निवडणूक लढवीत आहे.
अमरावती, हिंगोली, सोलापूर, नांदेड, अकोला, बीड, परभणी, बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर या दहा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे.
अमरावतीत शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ आणि यांना राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिलेल्या नवनीत राणा यांच्यात मुख्य लढत आहे.
हिंगोलीत खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांत आहे.
सोलापूर राखीव मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अत्यंत चुरशीचा असा तिरंगी सामना होत आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांच्यात चुरस आहे.
अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत आहे. बीडमध्ये खरी लढत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यातच होत आहे.