दुहेरी खुनातील दुसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0

चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील आदर्श नगर मध्ये 2 मार्च 2017 रोजी मध्यरात्री घरात झोपलेल्या दांपत्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने महिलेचा जागीच तर त्यांच्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता आरोपींनी 35 हजाराचे दागिने घेवून पलायन केले होते. यातील एक आरोपीला अटक केली होती तर दुसरा आरोपी फरार होता. दुसर्‍या आरोपीला आरोपीला चाळीसगाव शहर पोलीसांनी पुणे येथुन अटक केली आहे.

वानवाडी पुणे पोलिसात गुन्हा दाखल
चाळीसगाव शहरातील हिरापुर रोडवरील आदर्श नगरमध्ये 2 मार्च 2017 रोजी रात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास जिजाबाई दगडु देवरे (60) व दगडु दौलत देवरे हे रात्री घरात झोपलेले असतांना अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराच्या दरवाजाच्या कोयंडा तोडुन आत चोरी करण्यासाठी गेले असता जिजाबाई देवरे या जागी झाल्याने व झोपलेले दगडु देवरे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने जिजाबाई देवरे यांचा जागीच मृत्यू तर दगडु येवले गंभीर जखमी झाले होते त्यानंतर आरोपींनी 35 हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागीने घेवुन पोबारा केला होता नंतर दगडु देवरे यांचा देखील मृत्यू झाला होता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी शोध घेवुन आरोपी मनोजसिंग सिकंदरसिंग टाक (27, रा.म्हाडा कॉलनी, मलकापुर) यास 26 एप्रिल 2017 रोजी अटक करुन त्याची रवानगी जळगाव कारागृहात करण्यात आली आहे. त्याचा दुसरा साथिदार फरार असलेला आरोपी सागरसिंग सुरजसिंग उर्फ फंट्यासिंग अंडरले बावरी (20, भीमनगर, जालना ह.मु. गल्ली नं. 4, समर्थ नगर, नविन म्हाडा कॉलनी, हडपसर, पुणे) यास शस्त्र बाळगल्याप्रकरणी वानवाडी पुणे पोलीसांनी अटक करुन त्याची रवानगी पुणे मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दुसर्‍या आरोपीवर 15 पेक्षा अधिक घरफोड्याचे गुन्हे
माहिती मिळाल्यानुसार चाळीसगाव शहर पो.नि. रामेश्‍वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.चे हवालदार बापु भोसले व पथकाने पुणे येथुन आरोपीस 15 नोव्हेंबर 2017 रोजी ताब्यात घेवुन चाळीसगाव आणुन अटक केली व न्यायलयात उभे केले असता त्यास 21 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.