दुहेरी खून प्रकरणातील खरा फरार आरोपी जेरबंद

0

आरोपी बदलल्याचा प्रकार उघडकीस

पिंपरी-चिंचवड : दुहेरी खून प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान पोलीस आरोपींकडे चौकशी करत असताना एक नवीन तथ्य समोर आले आहे. सुरुवातीला प्रकरणातील नासिर उल हा फरार असल्याचे समोर आले. मात्र खुनावेळी घटनास्थळी नासिर उपस्थित नसून सावन नारायण जाधव (वय 25, रा. हिंजवडी. मूळ रा. सोलापूर) तरुण उपस्थित होता. सावन याच्या भावाने म्हणजेच अटक आरोपी पवन जाधव याने अन्य आरोपींना सावन याचे नाव लपविण्यास सांगितले होते.

आरोपींनीच सावनचे नाव लपविले
याप्रकरणी दत्ता भोंडवे, सोनाली जावळे, प्रशांत भोर आणि पवन जाधव या चौघांना अटक करण्यात आली. सुरुवातीला आरोपींच्या सांगण्यावरून नासिर उल याचे नाव आरोपी म्हणून गोवण्यात आले. त्यानुसार आरोपींकडे नासिर बाबत चौकशी करत असताना पोलिसांना नवीन तथ्य सापडले. प्रशांत आणि पवन यांच्या सांगण्यानुसार, दुहेरी खून प्रकारणावेळी नासिर हा उपस्थित नव्हता. तो आमचा मित्र असून सध्या पश्‍चिम बंगाल मध्ये राहतो. तो पुण्यात आलेला नाही. तर घटना घडताना प्रशांत सोबत सावन नावाचा मित्र उपस्थित होता.

नासिर राहतो बंगालमध्ये
सावन याचा भाऊ आरोपी पवन जाधव याने कटातील अन्य आरोपींना सावन ऐवजी नासिर याचे नाव घेण्यास सांगितले होते. मात्र पोलिसी खाक्यापुढे आरोपींचे गुपित फार काळ टिकू शकले नाही. तथ्य समोर आले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी सावन जाधव याला मंगळवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडे विचारणा केली असता तो देखील या प्रकरणात सहभागी असल्याची त्याने कबुली दिली.