मुंबई । दुहेरी हत्याकांडात पोटची पोरगी आणि आई गमावलेल्या दाम्पत्याच्या घरी पुन्हा सुखाची नांदी झाली आहे. मुंबईतील संतोष आणि शीतल रायकर या दाम्पत्याला जुळी मुले झाली आहेत. सात वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडामध्ये रायकर यांची तीन वर्षांची मुलगी वैष्णवी आणि शीतल यांच्या 55 वर्षीय आई रंजना नागोरकर यांचा मृत्यू झाला होता. आम्ही जगण्याची आशा सोडली होती. गेल्या सात वर्षांत ना आम्हाला सुखाची झोप लागली, ना आम्ही कधी समाधानाने दोन घास खाल्ले. माझी पत्नी त्या दिवसानंतर कधीच नोकरीवर गेली नाही. माझी मुलगी आणि सासूबाईंच्या हत्येचा न्याय मिळायला हवा, हाच माझ्या जगण्याचा ध्यास होता असे संतोष म्हणाले. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. वेदनादायी आयुष्य जगणार्या रायकर दाम्पत्याने पुन्हा बाळासाठी प्रयत्न करावा, असे अनेक नातेवाइकांनी त्यांना सुचवले. मात्र वयाच्या 44 व्या वर्षी पुन्हा पितृत्वसुख लाभेल, याची आशा आपण सोडली होती, असे संतोष सांगतात.
ज्या क्षणी जुळ्या मुलांचे चेहरे पाहिले, तेव्हा वाटले माझ्या जखमा पुन्हा भरतील आणि मी आनंदी होईन अशा भावना 37 वर्षीय शीतल रायकर यांनी व्यक्त केल्या. 9 जानेवारीला 29 व्या आठवड्यात बाळांचा प्रीमॅच्युअर जन्म झाला. मुलाचे वजन 1.6 किलो, तर मुलीचे 1.3 किलो आहे. वैष्णवी आणि आईच्या मृत्यूची घटना विसरलेलो नाही. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे रायकर दाम्पत्य सांगते. ऑफिस आणि कोर्ट यातच आयुष्य विभागले गेले आहे. प्रत्येकवेळी आरोपी जामिनासाठी वरच्या कोर्टात धाव घेतात, तेव्हा मी त्यांना विरोध दर्शवतो. आतापर्यंत सात वेळा मी त्यांचा जामीन रोखला आहे, असे संतोष सांगतात
काय होते हत्याकांड?
3 जून 2011 रोजी सायन कोळीवाडातील इंदिरानगरमधल्या राहत्या घरी रायकर दाम्पत्य कामावरुन परतले. बेल वाजवूनही बराच वेळ कोणीही दार उघडले नाही, त्यामुळे संतोष शिडीने वर चढले आणि खिडकीतून घरात शिरले. वैष्णवी आणि आजी रंजना रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. डंबेलने दोघींच्या डोक्यावर वार केल्यानंतर मारेकर्यांनी त्यांचा गळा चिरला होता. ऑटोप्सी रिपोर्टनुसार दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. घरातून 3.6 लाख रुपये किमतीचे 240 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि साडेतीन हजार रुपयांची रोकड गायब होती. कुटुंबाच्या ओळखीतील एखादी व्यक्ती गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. चार महिन्यांनी ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी 21 वर्षीय विशाल श्रीवास्तवला अटक केली. रायकरांच्या शेजारी राहणारा विशाल हा हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी होता. अचानक त्याने महागड्या वस्तूंची खरेदी सुरु केल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला होता. पाल मिसळून उकळलेले दूध देऊन मारण्याचा प्रयत्नही विशालने आधी केला होता. मात्र, आजींनी ते दूध प्यायले नाही आणि त्याचा इरादा फसला.