अहमदनगर: खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला सीआयडीने केडगाव हत्याकांडाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले असून त्याला अटक केली आहे. कोतकर याला आज मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एखाद्या गुन्ह्यात आधी शिक्षा झालेल्या आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी लागते. संदीप कोतकर संदर्भात राज्य सरकारने सीआयडीला केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार सीआयडीने काल सोमवारी दुपारी नाशिक कारागृहात जाऊन कोतकरला वर्ग करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत रात्री त्याला अहमनगर येथे आणले.
केडगाव येथे सात एप्रिल रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे व संजय कोतकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या हत्याकांडात आरोपी म्हणून संदीप कोतकर यांच्या नावाचा समावेश आहे.