मुंबई : शेतकऱ्यांच्या संपावेळी दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून विकत घेण्याच्या दुधाचे दर प्रतीलीटरसाठी तीन रूपयांनी वाढविले आहेत. ही वाढ येत्या २१ जूनपासून अंमलात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
मंत्रालयात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी या निर्णयाची माहिती देताना म्हटले की, शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून देत असतानाच त्याचा भार ग्राहकांवर पडणार नाही याचीही काळजी राज्य सरकारने घेतली आहे. सरकार व सहकार क्षेत्रातील डेऱ्या ग्राहकांच्या दुधाचे दर वाढवणार नाहीत. खाजगी दुधाचेही दरही वाढू नयेत, असा सरकारचा प्रयत्न आहे. पुढच्या काळात सरकारी, सहकारी व खाजगी क्षेत्रातील ग्राहकांना पडणारे दुधाचे दर सारखेच ठेवण्यासाठी कायदा केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
फडणवीस सरकाने केलेली ही तिसरी दरवाढ असून याआधी दोन वेळा प्रत्येकी दोन रूपये दरवाढ शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यापुढे दरवर्षी महागाई निर्देशांकाशी निगडित अशी खरेदीदरात वाढ करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे, असेही जानकर यांनी सांगितले. 3.5 टक्के फॅटचे गाईचे दूध आज 24 रुपये लीटरने घेतले जाते. ते आता 27 रूपयांनी घेतले जाईल. म्हशीच्या दुधाचा खरेदीचा दर सध्या 33 रूपये लीटर आहे. तो 36 रूपये करण्यात येत आहे. ही 3 रूपयांची वाढ 21 जून पासून लागू करण्यात येईल. दूध खरेदीचे पैसे संबंधित संस्थेने यापुढे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले पाहिजेत यासाठी शासनाने आदेश काढले आहेत, सेही त्यांनी स्पष्ट केले.
जानकर यांच्या समवेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, दुधाच्या दरासाठी दुग्धविकास सचिवांच्या नेतृत्त्वाखाली पणन, सहकार, वित्त आदी विभागांच्या सचिवांची अधिकारदत्त समिती नेमण्यात आली होती. त्यांचा अहवाल आला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, सुभाष देशमुख आदी उपस्थित होते. जर काही संस्था वा विक्रेते शेतकऱ्यांचे दर वाढवले असे सांगून ग्राहकांकडून जादा दर वसूल करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही जानकर व खोत यांनी जाहीर केले.