दूध ‘झेड सिक्युरिटी’त

0

पिंपरी-चिंचवड : शेतकर्‍यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या धास्तीमुळे कोल्हापूरच्या दूधाला चक्क ‘झेड सुरक्षा’ व्यवस्था लाभली. एखाद्या मंत्र्याचा ताफा निघावा तसा कोल्हापूरातील 27 टँकर कडेकोड बंदोबस्तात मुंबईला रवाना झाले. मात्र, महामार्गावरील वाहनचालक या दृष्यामुळे अवाक झाले. गोकुळ व वारणा दुधाचे हे टँकर होते.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून मुंबईला दररोज 350 टँकर दूध जाते. रात्री अकरापासून दुपारी साडेबारापर्यंत टँकरच्या फेर्‍या सुरू राहतात. हे दूध मुंबईच्या विविध भागात असलेल्या या दूध संघाच्या शीतकेंद्रांमध्ये ठेवले जाते. नंतर ते वितरीत होते. दररोज बिनधोकपणे दूधपुरवठा सुरू राहतो. मात्र, संपामुळे अडथळा येवू नये, तसेच मुंबईकरांच्या पहिल्या चहाची अडचण होवू नये यासाठी सोमवारी या टँकरना सुरक्षा कडे दिले गेले. यामुळे ‘महाराष्ट्र बंद’ असूनही सुरक्षितरित्या मुंबईला पोहोच झाले.

रस्त्यावर ओतले जाते दूध
आजवरच्या शेतकरी आंदोलनात दूधाचे टँकर फोडणे, रस्त्यात अडवून दूध ओतणे असे प्रकार घडतात. याचा परिणाम मुंबईच्या ग्राहकांवर होतो. सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपातही काही ठिकाणी टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून टाकले होते. याचमुळे सोमवारी टँकरना पोलिस संरक्षण दिले गेले.

शेतकर्‍यांआड राजकारण सुरु : मुख्यमंत्री
राज्यातल्या अनेक शेतकरी संघटनांनी शेतकरी संपात सहभाग दर्शवला असतानाच, शेतकर्‍यांच्या नावाखाली कुणी राजकारण करत असेल तर त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यातल्या विविध शेतकरी तसेच सामाजिक संघटनानी एकत्रितरित्य शेतकर्‍यांचा संघर्ष टोकाला नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच या संघटनानी शेतकर्‍यांच्या आंदोलनांबाबत 21 शेतकरी नेत्यांच्या सुकाणू समितीची घोषणा करण्यात आली आहे. या नंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची असून, आता मुख्यमंत्री कुणाकुणाशी चर्चा करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. सरकारने अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार या निर्णयाबाबत कटिबध्द आहे. या व्यतिरिक्त सरकार अजूनही शेतकर्‍यांशी चर्चेला तयार आहे. मात्र शेतकर्‍यांच्याआड राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणे, तसेच या विषयाचे राजकारण करणार्‍यांच्या सोबत सरकार कदापि चर्चा करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.