दौंड । राज्यातील सर्वात मोठे बजेट असलेला वरवंड येथील दूध भुकटी प्रकल्प लवकरच सुरू करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. ते दौंड तालुक्यातील डाळींब येथे हनुमान मंदिराच्या कलशारोहन व उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
दुग्धविकास खात्याचे यापूर्वी बजेट 140 कोटी होते. ते आता वाढून 750 कोटी झाले आहे. दुधाच्या दरात 7 रुपयांची वाढ केली आहे. दुधाच्या दरात 70-30 याप्रमाणे धोरण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले. शेतकर्यांना शेती व्यतिरीक्त आदी उद्योगातून हातभार लागावा म्हणून मत्स्य उद्योग आदी वाढविण्यासाठी 21 योजना आणल्या आहेत. त्यामध्ये चारायुक्त शिवार योजना, मत्स्ययुक्त तलाव योजनांसह आदी योजनांचा समावेश असल्याचे जानकर यांनी सांगितले.
पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून खुपटेवाडी फाट्याचे पाणी दौंडच्या पश्चिम भागातील जिरायती भागास पूर्ण दाबाने मिळण्यास तांत्रिक कारणांमुळे अडचणी येत आहे. त्यात तांत्रिक बदल करून या भागास पाणी कसे देता येईल, याबाबत प्रयत्न केले जातील. तसेच या भागात उर्वरीत असणारी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे केली जातील. पुढील काळात पुण्याच्या धरणाचे आपल्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी संघर्ष होईल. हक्काचे पाणी मिळाले पाहिजे अन्यथा न्यायालयीन लढाईची तयारी केली असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्या पूनम दळवी, कीर्ती कांचन, हेमलता बढेकर, रणजितसिंह निंबाळकर, राजेंद्र कांचन, हवेली पंचायत समितीच्या सभापती वैशाली महाडीक, दौंड तालुका भाजपचे अध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, अशोक होले, डाळींबच्या सरपंच मंगला सुतार, किसन म्हस्के, नंदकुमार म्हस्के, बाळासाहेब म्हस्के यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.