येरवडा । पुणे-नगर रोड महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून जलवाहिनी फुटल्याने त्यातील पाणी रस्त्यावर वाहत असल्याने पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून यावर पालिका पाणीपुरवठा विभाग अधिकारी उपाययोजना करणार का; याचे उत्तर नागरिकांना मिळत नाही. चंदननगर परिसरातील दूषित पाणीपुरवठ्याबाबत शिवसेनेने घेराव आंदोलनही केले होते. तरीही येथील परिस्थितीत फरक पडलेला नाही.
कोट्यवधी खर्च करून पाइप लाइन
वडगाव शेरी, खराडी व चंदननगर भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी पालिका पाणीपुरवठा विभागाने बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग येथे कोट्यवधी रुपये खर्च करून येरवडा येथून बीआरटीलगत असणार्या दुभाजकांमधून लाइन टाकण्यात आली आहे. तसेच पर्यावरणासंदर्भात जनजागृती व्हावी. या उद्देशाने लुंकड रिऍलिटी संस्थेमार्फत दुभाजकावर सूर्यफूल व शोभेची झाडे लावण्यात आली आहेत.
समस्येकडे दुर्लक्ष
चंदननगर परिसरात होणार्या दूषित पाण्यामुळे यापूर्वी शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून पाणीपुरवठा अधिकार्यांना घेराव ही घालण्यात आला होता. मात्र एवढे करून देखील अधिकार्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने अधिकारी व कर्मचारी यांची उदासिनता स्पष्ट दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या व अपघाताच्या दृष्टीने फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कामगारांना दुर्गंधीचा त्रास
अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे दुभाजकावरच खोलवर खड्डा करण्यात आल्याने खड्ड्यामध्ये सांडपाणी साचत असून पाणी दूषित झाल्याने येथे काम करणार्या कामगारांना दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ येत आहे. त्यातील राडारोडा हा उघड्यावरच टाकल्याने कर्मचार्यांना काम करणे देखील कठीण झाले आहे. हे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे वाहनचालकांना किरकोळ अपघात होत आहेत. त्यातच ही मुख्य जलवाहिनी असल्याने यामुळे वडगाव शेरी, खराडी व चंदननगर भागातील नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे.