दृष्टिहीनांना मिळाला राजेशाही लग्न सोहळ्याचा अनुभव

0

पुणे । सनई-चौघड्याचा निनाद, पारंपरिक वेशभूषेत सजलेली नवरा-नवरी, रुखवत अन् कलवर्‍यांची धावपळ, मंगलाष्टकांचा मंजुळ स्वर, एकमेकांच्या डोळ्यात नव्या आयुष्याच्या सुरुवातीची उमेद अन् जोडीदाराच्या स्वप्नांची मैफल रंगवत देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने ’ते’ अडकले विवाहबंधनात! आगळ्यावेगळ्या अशा या विवाहसोहळ्याने या दृष्टीहिनांना राजेशाही लग्नाचा अनुभव मिळाला.

नाजूश्री सभागृहात पार पडला कार्यक्रम
निमित्त होते, क्रिप्स फाउंडेशनच्या वतीने आयोजिलेल्या 25 दृष्टिहीन जोडप्यांचा (दोघांनाही दृष्टी नसलेले) सामूहिक विवाह सोहळ्याचे. पुण्यात पहिल्यांदाच झालेला हा नयनरम्य सोहळा रविवारी गंगाधाम चौकातील जिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजूश्री सभागृहात पार पडला. यावेळी 300 हून अधिक लोकांना अन्नदान करण्यात आले. उद्योजक कृष्णकुमार गोयल, भावेश भाटिया, संस्थेचे अध्यक्ष मनोहर फेरवानी, सचिव ईश्‍वर कृपलानी, विश्‍वस्त भारत नागोरी, महेंद्र जैन, केवल सेठिया, सुरेश जेठवानी, सिमरन जेठवानी, विनोद रोहानी, गोपाल डावरा, रमेश पलंगे यांच्यासह इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

संसारोपयोगी वस्तूंचे वाटप
क्रिप्स फाउंडेशनने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. या दृष्टिहीन मुलामुलींना वैवाहिक जीवनाचा आनंद मिळावा, त्यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजिला. राज्यातील 25 दृष्टीहीन दाम्पत्यांचे थाटामाटात लग्न लावून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संसार थाटण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्यांना संस्थेमार्फत दिल्या आहेत. अनाथ मुलींचे कन्यादान संस्थेच्या स्वयंसेवकांनी केले आहे, असे मनोहर फेरवानी यांनी सांगितले.

51 हजारांचा रुखवत आंदण
हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आणि पारशी धर्माचे धर्मगुरू नवविवाहीत जोडप्यांना शुभाशिर्वाद देण्यास उपस्थित होते. काशीविश्‍वेश्‍वर येथील गुरुजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जोडप्याचे लग्न लावण्यासाठी 25 ब्राम्हण होते. विवाह सोहळ्यासाठी आवश्यक असणारा सर्व खर्च क्रिप्स संस्थेने उचलला. रुखवत, झाल, मंगळसूत्र, जोडवी यांपासून घरात आवश्यक असणार्‍या सर्व वस्तूंचा यात समावेश आहे. तसेच घरसंसारासाठी प्रत्येकी 51 हजाराचा रुखवत आंदण देण्यात आला.