सहा.अधीक्षक नीलोत्पल यांची कारवाई ; चार चारचाकींसह सव्वा लाखांची रोकड जप्त
भुसावळ– पहूर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या देऊळगाव (ता.जामनेर) येथे हायप्रोफाईल जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पथकाने छापा टाकत 17 जुगारांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून चार चारचाकींसह 14 दुचाकी, 17 मोबाईल व सव्वा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. भुसावळच्या अधिकार्यांनी केलेल्या कारवाईने जुगार्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच येथे प्रशिक्षणार्थी डीवायएसपी धनंजय पाटील यांनी धाड टाकून कारवाई केली होती हेदेखील विशेष !
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासंदर्भात सहा.अधीक्षक नीलोत्पल यांना आदेश दिल्यानंतर जुगार अड्ड्याची गुप्त पाहणी करून गुरुवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली. पकडण्यात आलेले 17 जुगारी बुलढाणा, पहूर, शेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातील चार चारचाकी, 14 दुचाकी, 17 मोबाईलसह एक लाख 25 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे बुलढाणा बॉर्डरवरील पहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा हायप्रोफाईल अड्डा एका शेतात टपरी टाकून बिनदिक्कत अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यांनी केली कारवाई
सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह उपनिरीक्षक सचिन खामगड, युनूस शेख, मो.अयाज, राजेश काळे, संकेत झांबरे, संदीप चव्हाण, समाधान पाटील, मोहन पाटील, सोपान पाटील यांच्यासह आरसीपीच्या सात कर्मचार्यांनी ही कारवाई केली.