देऊळवाड्यात बिबट्याच्या हल्लयात काका, पुतण्यासह वनपाल जखमी

0

शेतशिवारात काम करणार्‍या मजुरांसह शेतकर्‍यांवर हल्ला

शेतकर्‍यांमध्ये भिती

वनविभागाचा फौजफाटा बिबट्याच्या शोधार्थ शिवारात

जळगाव- तालुक्यातील सुजदे-भोलाण्यासह असोदा शिवारात बिबट्याने मंगळवारी थैमान घातल शेतात काम करणार्‍या मजुरासह वृध्द शेतकर्‍यांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. प्रमोद संजय सोनवणे (20) व देवचंद लक्ष्मण सोनवणे (वय 57) दोघे रा. देऊळवाडे ता.जळगाव, अशी जखमी काका-पुतण्याचे नावे आहे. या घटनानंतर बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचार्‍यांवर बिबट्याने हल्ला चढविला. यात वनपाल गोपाळ रामदास बडगुजर (वय 51) हे जखमी झाले आहे.

देऊळवाडे येथील प्रमोद संजय सोनवणे हा तरुण शेतमजुर असून मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास सुजदे-भोलाणे शिवारातील दुसर्‍याच्या शेतात दादर कापण्याच्या कामासाठी गेला. दादर कापून झाल्यावर प्रमोद शेतातून घराकडे निघत असताना, पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. 5 ते 10 मिनिटांच्या झटापटीत प्रमोदने बिबट्याच्या मानेखाली बुक्का मारल्याने बिबट्या पळून गेला. यानंतर प्रमोदला त्याचा मित्र प्रकाश शालिक सोनवणे याला दुचाकीवरुन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बिबट्याने त्याच्या पाठीवर, दंडावर हातावर पंजे मारल्याने दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पुतण्यानंतर वृध्द काकावर बिबट्याचा हल्ला
चवताळलेल्या बिबट्याने यानंतर दुसर्‍या शेताकडे मोर्चा वळविला. याच शिवारात प्रमोद सोनवणे याचे वृध्द काका देवचंद लक्ष्मण सोनवणे यांचे स्वतःचे शेत आहे. या शेतात 10 वाजेच्या सुमारास देवचंद सोनवणे पिकाला पाणी भरण्यासाठी आले होते. पाणी भरत असताना काही कळण्याच्या आत त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. यात त्याच्या खाद्यावर, पोटावर जखमा झाल्या असून त्यांनाही त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

बिबट्याच्या शोधार्थ फिरणार्‍या वनपालावरही हल्ला
देऊळवाडे येथील दोन जणांना सुजदे भोलाणे शिवारात बिबट्याने हल्ला चढवून जखमी केल्याची माहिती जळगाव परिक्षेत्रातील वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनक्षेत्रपाल एन.जी.पाटील, वनपाल पी.जे.सोनवणे, वनपाल गोपाळ बडगुजर यांच्यासह 25 ते 30 जणांना फौजफाटा बिबट्याला पकडण्याच्या साहित्य तसेच वाहनासह सुजदे-भोलाणे शिवारात दाखल झाला. याठिकाणी प्रत्येकाने स्वतंत्र बाजूने बिबट्याचा शोध सुरु केला. यादरम्यान एका ठिकाणी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दीड वाजता वनपाल गोपाळ रामदास बडगुजर यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने पोटावर तसेच दोन्ही मांड्यावर चावा घेतल्याने बडगुजर यांना मोठ्या जखमा झाल्या असून रक्तश्राव झाला होता. सहकार्‍यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

शेतकर्‍यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याची वार्ता वार्‍यासारखी तालुक्यात पसरली. या घटनांमुळे देऊळवाडे, सुजदे, भोलाणे यासह परिसरातील गावांमधील शेतकर्‍यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षात कधीही या परिसरात बिबट्याचे दर्शन सुध्दा झालेले नाही. पहिल्यांदाच बिबट्याने या परिसरात प्रवेश करत थेट हल्ला केल्याने वनविभागाच्या कर्मचार्‍यांनामध्येही आश्‍चर्य आहे.दरम्यान वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.