थोरात कुटुंबियांची 20 वर्षांची परंपरा
वाघोली : भारतीय संस्कृतीची धार्मिक, पौराणिक परंपरा जतन करण्यासाठी तसेच विविध देखाव्यातून समाज प्रबोधन करण्याचे काम गेल्या 20 वर्षापासून संदीप थोरात करत आहेत. थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे सचिव असले तरीही त्यांच्या व्यवसायाकडे ते जातीने लक्ष देतात. त्यांचा मुलगा करण थोरात याने महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच वडिलांचा वसा पुढे चालवला आहे. मुर्तीवंत हलते देखावे तयार करून विविध गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजामध्ये चालू असलेल्या अनिष्ट चालीरीतींविरुद्ध समाज प्रबोधनाचे व्रत या पिता पुत्राने अंगिकारले आहे.
देखाव्यातून धार्मिक, पौराणिक, छत्रपती शासन, घटोत्कच, मार्कण्डेय शिवभक्ती, भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध, स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण रक्षक, शेतकरी आत्महत्या, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी विविध देखावे तयार करण्यात आले आहेत. प्राचीन काळापासून महिलांना मानाचे स्थान असल्यामुळे स्त्री-शक्तीचे पूजन केले जाते. मात्र दुसरीकडे गर्भलिंगनिदान करून मुलींची गर्भातच हत्या करणे, जन्म झाला असल्यास मारून टाकण्याच्या अघोरी प्रकारांमुळे मुलींचा घटता जन्मदर ही एक राष्ट्रीय समस्या म्हणून पुढे आली आहे. त्याबरोबर शेतकरीवर्ग आत्महत्येकडे वळला आहे. विदूतरोषणाई व तांत्रिक जोड देऊन अतिशय कुसरीने तयार केलेल्या देखाव्याद्वारे अनेक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती निर्माण करण्याचे काम थोरात यांनी अखंड चालू ठेवले आहे.