जळगाव । जळगाव लोकसभा मतदारसंघातून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली असून त्यांची उमेदवारी भक्कम करण्यासाठी खुद्द खा. शरद पवार हे मार्च महिन्यात जळगाव दौरा करणार आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. या मतदारसंघासाठी जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, माजी खा. अॅड. वसंतराव मोरे, प्रमोद पाटील, विकास पवार, डॉ. राजेश पाटील यांनी मुलाखती दिल्या होत्या. सुरुवातीला जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र मागील आठवड्यात पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हा नेत्यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. तसेच खा. शरद पवार यांनी देखील देवकरांशी व्यक्तिगत चर्चा करून लोकसभा लढविण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी देवकरांनी ‘विधानसभाच बरी’, असे सांगत कानावर हात ठेवले होते.
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाच्या उमेदवारासमोर लढत देण्यासाठी राष्ट्रवादीला तगड्या उमेदवाराचा शोध होता. खासदार शरद पवार यांनी अखेर हा शोध थांबवून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचे आदेश 18 रोजी फोनवरून दिले. थेट पवारसाहेबांचा आदेश आल्याने गुलाबराव देवकर यांनी लोकसभा लढण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे.
खा. शरद पवार मार्चमध्ये जळगावात
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गुलाबराव देवकर यांची उमेदवारी भक्कम करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार हे मार्च महिन्यात दौरा करणार
भाजपासोबत लढत रंगणार
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खा. ए. टी. पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास त्यांची गुलाबराव देवकरांसोबतची लढाई रंगणार आहे. कारण, दोन्ही उमेदवार हे सर्वांगिणदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागून राहणार आहे.
जळगाव शहर महत्त्वाचा पॉकेट
जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर हे महत्त्वाचा ‘पॉकेट’ मानले जाते. जळगाव शहराने स्थानिक नसलेल्या खा. ए. टी. पाटील यांना 1 लाख 22 हजार 127 चे मताधिक्य दिले आहे. दुसरीकडे गुलाबराव देवकर हे जळगावचे रहिवासी असल्याने आता हा ‘पॉकेट’ कुणाच्या पारड्यात किती मताधिक्य देतो याची उत्सुकता लागणार आहे.
साहेबांचा आदेश शिरसावंद्य
सोमवारी, चाळीसगाव येथे लग्नानिमित्त गेलो असतांना पवार साहेबांचा फोन आला. त्यांनी जळगाव लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी करायची असून, उद्यापासून प्रचाराला लागा असे आदेश दिले. साहेबांचा आदेश हा शिरसावंद्य असून लोकसभा निवडणुकीसाठी कामाला सुरुवात केली आहे.
-गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री