महाड : माणगांव तालुक्यातील भिरा गावच्या हद्दीत असलेल्या देवकुंड धबधबा येथे पावसाळ्यात येणा-या पर्यटकांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने प्रशासनाने कडक पावले उचलली असुन धबधब्यांच्या 1 कि.मी. परिसरात 9 ऑक्टोबर पर्यंत माणगावचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.सदर आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा माणगाव उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी बाळासाहेब तिडके यांनी दिला आहे.
देवकुंड धबधबा पाहण्यासाठी राज्यातून अनेक पर्यटक येथे येत असतात त्यात हौशी पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यात पुण्याचे दोन पर्यटक बुडाले होते तर जून महिन्यात येथे अडकलेल्या 55 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी वाचवले होते.तरीही पर्यटकांचा येथे गोंधळ सुरुच आहे.या प्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याने आता येथे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(4)नुसार मनाई करण्यात आली आहे,धबधबा परिसरात मद्यपान करणे ,मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे,वाहतूक करणे,अनधिकृत मद्य विक्री करणे,अनधिकृत मद्य विक्री करणे व उघडया जागेवर मद्य सेवन करणे. सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे. धोकादायक पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.धबधब्याच्या वरील बाजुला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे.रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे. वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा,काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघडयावर इतरत्र फेकणे. महिलांची छेडछाड करणे,टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य् वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, ध्वनीप्रदुषण करणे अशा कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.