देवगड हापुसचे पुण्यात आगमन; एका पेटीला 5 हजार रुपयांचा भाव

0

पुणे । रसाळ गोड अशा देवगड हापुसची या हंगामातील पहिली आवक रविवारी झाली. छ.शिवाजी मार्केट गुलटेकडी येथिल युवराज काची यांच्या गाळ्यावर देवगड हापुसच्या सहा पेट्यांची आवक झाली. देवगड हापूसच्या 6 डझनच्या पेटीला 5 हजार रूपये भाव मिळाला असे काची यांनी सांगीतले. देवगड भागातील कुणकेश्‍वर येथिल शेतकरी संतोष नानेकर यांच्या शेतातील हा माल असुन साधारण 10 दिवस उशीरा आंब्याची आवक झाली आहे. वेळेत आंब्याची आवक झाली असती तर एका पेटीला 10 हजाराचा भाव मिळाला असता, असे व्यापारी काची यांनी सांगीतले. देवगड हापुसचा हंगाम साधारण मार्च अखेर संपतो. एप्रिल,मे,जुन च्या जास्त उष्ण वातावरणात हा आंबा टिकाव धरत नाही. सालीला पातळ व छोटी कोय यामुळे हा आंबा जास्त गरासाठी प्रसिध्द आहे. तसेच पातळ साल असल्याने आंबा नैसर्गीकरित्या पिकविला जातो.

सागर फ्रुट यांनी केली पहिली खरेदी
औंध येथिल सागर फ्रुटचे फळविक्रेते मस्जीद बागवान यांनी देवगड हापुसची पहिली खरेदी केली. अशी माहिती व्यापारी काची यांनी दिली. रत्नागिरी हापुसची रविवारी सुमारे 50 पेटया आवक फळबाजारात झाली. रत्नागिरी हापुसच्या 3 ते 5 डझनच्या पेटीला सध्या 3 ते 5 हजार चा भाव मिळत असल्याचे व्यापारी काची यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरी हापुसची आवक अजूनही सुरळीत सूरू झाली नसून येत्या 10 ते 12 दिवसात सुरळीत आवक सुरू होईल असा अंदाज व्यापारी युवराज काची यांनी व्यक्त केला