देवदर्शनाहून परतणार्‍या महिलेवर दोघांचा बलात्कार

0

पुणे : नारायणपूर येथून देवदर्शन करून परतणार्‍या महिलेवर दोघाजणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उरूळी-कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणे (ता. हवेली) घाटामध्ये घडली. या नृशंस प्रकारानंतर फॉर्च्युनर गाडीतून आलेले नराधम महिलेला घाटातच सोडून पसार झाले. शुक्रवारी दहा ते 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी लोणी कोळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित गाडीचा क्रमांक मिळवला आहे. या गाडीच्या तपासासाठी पोलिस पथक पारनेर येथे गेले होते. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

गाडीतच अश्लील चाळे, घाटात केला लैंगिक अत्याचार
सविस्तर असे, की केडगाव परिसरातील असलेली 40 वर्षीय महिला देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. परंतु, घरी येताना तिला उशीर झाला. परिणामी, ती पारगाव चौफुला येथे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वाहनाची वाट पाहात उभी होती. त्याचवेळी फॉर्च्युनर गाडीतून दोघेजण तिच्याजवळ आले व तिला केडगाव येथे सोडतो म्हणून गाडीत बसवून घेतले. या दोघांनी गाडीतच तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदर महिला घाबरली. या नराधमांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत शिंदवणे घाटात नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. बलात्कारानंतर या महिलेस पुन्हा गाडीत न घेता घाटातच सोडून ते पसार झाले. या घटनेने घाबरलेली ही महिला रात्रीच्या अंधारातच केडगावकडे येण्यास निघाली. रस्त्याने जाणार्‍या दुचाकीस्वारांनी तिला मदत करत लोणी काळभोर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचविले. तेथे सदर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फॉर्च्युनर गाडीचा नंबर मिळाला
आळीपाळीने बलात्कार केल्यानंतर नराधम सदर महिलेला घाटातच सोडून पसार होत असताना, सदर पीडित महिलेने गाडीचा क्रमांक एमएच 14, 0002 हा लक्षात ठेवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या क्रमांकावरून आरोपीचा शोध सुरु केला होता. त्यासाठी एक पथक पारनेर येथेही गेले होते. मूळ मालकाने ही गाडी अन्य एका जणास विकली असून, त्याची चौकशी पोलिसांनी केली. लवकरच मूळ आरोपींपर्यंत पोहोचू अशी माहिती लोणीकाळभोर पोलिसांनी दिली. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.