मुंबई। देवनार पशुवधगृहातील प्रशासकीय शुल्क दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून बकरी ईदच्या दिवसात येथे आलेल्या शेळ्या, मेंढ्या, म्हैस, रेडे व म्हशींचे पाड्यांवर प्रत्येकी 100 रुपये आकारण्यात येईल. 15 दिवस शुल्क घेतले जातील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. देवनार कत्तलखान्यात दरवर्षी सुमारे पावणे दोन ते दोन लाख शेळ्या, मेंढ्या बकरी ईद निमित्ताने आणल्या जातात. शेळ्यांना व बकर्यांना निवारा शेड, पाण्याची व्यवस्था, साफसफाईची कामे, विद्यूत पुरवठा केला जातो. बकरी ईदपासून 15 दिवस व्यवस्था पार पाडली जाते.
समितीच्या मंजुरीनंतर ही शुल्कवाढ लागू केली जाईल
ही सुविधा पुरवताना महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा पडतो. ईद सणापासून शेळ्या व मेंढ्यांच्या धार्मिक वधाकरता घरी घेऊन जाण्याकरता निःशुल्क पास दिले जातात. त्यामुळे सन 2014 पासून पालिकेला मिळणार्या उत्पन्नात एक ते दीड कोटींनी घट झाली आहे. 2017 मध्ये बकरी ईदकरिता पालिकेने 6 कोटी 90 लाख 84 हजार 303 इतका खर्च केला. मात्र, पालिकेला केवळ 2 कोटी 37 लाख 84 हजार 696 महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा तोटा भरुन काढण्यासाठी पालिकेने ईद पूर्वीचे 12 दिवस, बकरी ईदचा दिवस आणि त्यानंतरचे 2 दिवस असे 15 दिवस पशुवधगृहात विक्रीकरिता आणल्या जाणार्या शेळ्या, मेंढ्या तसेच म्हैस, रेडे, म्हशींचे पाडे याकरिता प्रत्येकी 100 रुपये इतके प्रशासकीय तथा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. समितीच्या मंजुरीनंतर ही शुल्कवाढ लागू केली जाईल. मात्र, 2019-20 पासून प्रतिवर्षी 10 टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.