देवपुरात घरमालकासह भाडेकरूचे घरही फोडले

0

धुळे। देवपूरातील गजानन कॉलनीत रहाणार्‍या सुलोचना दशरथ येवले यांचे घर गुरुवारी रात्री चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी घरातून किमती ऐवज चोरुन नेला आहे. तसेच त्यांचे भाडेकरुंकडेही चोरी झाली आहे. उकाडा सहन होत नसल्याने ते गच्चीवर झोपलेले होते. सकाळी उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गजानन कॉलनीतील प्लॉट क्र. 34 मधील रहिवासी सुलोचना दशरथ येवले या लग्नकार्यानिमित्त चोपडा येथे गेल्या होत्या.

रात्री त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळविला. कपाटातील ठेवलेला किंमती ऐवज लांबविला. येवले या अद्यापही घरी परतलेल्या नाहीत, त्यामुळे नेमका किती रुपयांचा ऐवज गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येवले यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहणारे प्रकाश कौतिक निकम हे रात्रीला गच्चीवर झोपलेले होते. त्या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी घरातील एलईडी टिव्ही, 6 गॅ्रम सोन्याचे टोंगल, 3 ग्रॅम कानातले, 3 हजार रुपयांच्या चांदीच्या पट्ट्या तसेच 2 हजार 200 रूपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी निकम यांच्या फिर्यादीवरुन देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.