धुळे । शहरातील देवपूर भागात नदी किनारी असलेल्या हुसेनिया नगर, पांचाळवाडा येथे शुक्रवारी रात्री जुन्या वादातून दोन गटात दंगल झाली. यात सर्रासपणे तलवार, छर्याची बंदूक, हॉकी स्टीक, लाठ्या-काठ्यांचा वापर झाला. यावेळी डीवायएसपी सचिन हिरे, पीआय दत्ता पवार यांच्यासह दंगल काबू पथकाने सौम्य लाठीचार्ज केल्याने जमाव पांगला. दोन्ही गटातील जमावाने पळ काढला. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अशी घडली होती घटना…
नाजीयाबी शेख शरीफ (वय-30) रा. मुस्तफा कॉलनी चोपडा, जि.जळगाव, ह.मु. हुसेनिया नगर, पांचाळवाडा, देवपूर या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 4 मे रोजी रात्री 10 वाजता मागील भांडणाची कुरापत काढून दादू शिवराम मराठे, सोनु शुभम पटेल (अजीज यांचेकडे राहणारा), सुरेश ब्रीजलाल देवीकर, गौतम मोरे, करण अकवारे व त्यांचे सोबत असलेल्या 4 ते 5 जणांच्या जमावाने हातात छर्यांची बंदुक, तलवार, हॉकी स्टीक, लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या घेवून नाजीयाबी यांचा मुलगा अदनान शेख शरीफ याच्यावर घरात घुसून हल्ला चढविला. दादू मराठे याने हातातील हॉकी स्टीकने पाठीवर व पायावर मारहाण करून सुरेश देवीकर याचे हातात छर्यांची बंदूकीचे बटने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. सोनू याने त्याचे हातातील तलवारीने अदनान शेख शरीफ याचेवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. परंतु अदनान याने तो वार चुकविला. करण अकवारे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने पाठीवर मारहाण केली. इतर 4 ते 5 इसमांनी त्यांच्या हातातील लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. सुरेश देवीकर याने एका महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज
यावेळी पंचवटी टॉवरजवळच रस्त्यावर हा जमाव हाणामारी करीत असल्याने त्या भागातून जाणार्या वाहनधारकांमध्ये धावपळ उडाली. परिसरातील लोकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. या दंगलीची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी अधिकार्यांना सूचना करुन तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. यानंतर डीवायएसपी सचिन हिरे व देवपूरचे पीआय दत्ता पवार हे दंगल काबू पथकासह घटनास्थळी दाखल झालेत. अगोदर त्यांनी दोन्ही गटातील लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अधिक आक्रमक होत असल्याने अखेर हिरे, पवार यांच्यासह पथकाने जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. यामुळे दोन्ही बाजूचा जमावाने तेथून पळ काढला. जमावातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दादू मराठे, सोनू पटेल, सुरेश देवीकर, गौतम मोरे, करण अकवारे व अन्य चार ते पाच जणांविरुध्द देवपूर पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तपास पोनि. दत्ता पवार करीत आहेत.