देवभुमीत उमलले कमळ

0

मुंबई । उत्तर प्रदेशातील मोदींच्या लाटेचा परिणाम शेजारील उत्तराखंडमध्ये झालेला यावेळी पहायला मिळाला. उत्तर प्रदेशप्रमाणे भाजपने इथेही स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसकडून हे राज्य हिरावून घेतले. मागील विधानसभेच्या निवडणुकीत याठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत झाली होती. त्या तुलनेत मात्र, यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीचा पेपर भाजपसाठी खूपच सोपा ठरला. निवडणुकीच्या आधी बंडखोरी करून काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या नऊ बंडखोर आमदारांनी भाजपच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या नऊपैकी सात बंडखोरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपने विजयाचा मार्ग मोकळा केला होता. या बंडखोरांमध्ये विजय बहुगुणा यांचा समावेश होता. बहुगुणा यांचे पक्षांतर काँग्रेससाठी खूपच महागडे ठरले. बहुगुणा भाजपमध्ये गेल्यामुळे राज्यातील ब्राह्मण समुदायाची एकगठ्ठा मते भाजपच्या पारड्यात पडली. राज्यात सत्तास्थानी राहण्यासाठी ब्राह्मण आणि क्षत्रियांमध्ये नेहमीच इथे रस्सीखेच सुरू असते.पार्टीतल्या नऊ जणांनी बंडखोरी केल्यामुळे मुख्यमंत्री हरिश रावत यांची सरकारवर असलेली पकड ढिली झाली होती.

काँग्रेसचेच सरकार आणि त्या पक्षात असलेली गटबाजी यामुळे उत्तराखंडमधल्या जनतेत नाराजीचे वातावरण होते. विजय बहुगुणा यांच्यासमवेत बंडाचा झेंडा फडकवणार्‍या हरक सिंग रावत, अमृता रावत, कुंवर प्रणव सिंग चॅम्पियन, सुबोध उनियाल, उमेश शर्मा काऊ, प्रदीप बात्रा, शैलाराणी रावत आणि शैलेंद्र मोहन सिंघल यांचा हरिश रावत सरकारला आधार होता. मात्र, हा आधार निघून गेल्यावर सरकार वाचवण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यावर झाला. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बंडखोरांपैकी सात जण भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढल्यामुळे काँग्रेसने मोठा जनाधार गमावला होता.