दोन तरुणाच्या मृत्युने हळहळ : दिशादर्शक फलकाची गरज
चाळीसगाव- येथील देवळी ते आडगाव या रस्त्यावरची गंभीर वळणांवर अनेक अपघातांची मालिका सुरूच असून आजवर शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. तर शेकडो वाहने याच वळणांवर पलटी झाल्याने अनेक गंभीर जखमी झाले आहेत. हे वळण अतिशय धोकेदायक असल्याने या रस्त्यांच्या साईड पट्ट्यासह दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर खांब बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कालच्या अपघातात दोन तरुणाच्या मृत्युने पुन्हा एकदा देवळी आडगाव परिसर चर्चेत आला असून मृत्यूचा सापळा बनलेला रत्यावर होणार्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
देवळी वळण हा रस्ता अनेक दिवस दुरुस्ती न झाल्याने वाळीत पडल्यासारखी स्थिती झाली होती. आजही या रस्त्यावर गंभीर वळणांवर गाड्या धडकण्याची स्थिती जैसे थे आहे. काल शहरातील दोन तरुणाच्या मृत्युने ही गंभीर वळणांवर सोशल मीडिया वर जोरदार चर्चा सुरू होती. वाहनधारकांना येथील वळणावर कुठल्याही पद्धतीने मार्गदर्शक व दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारक समोरासमोर धडक देतो, किंवा पलटी होतो. या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्टया नादुरुस्त झालेल्या आहेत. काल झालेल्या मोटार सायकल अपघातात तर दोन ठार होऊनही अपघात कसा झाला हे गुलदस्त्यात आहे.
वाहने उलटण्याचे प्रमाण वाढले
देवळी आडगाव या रस्त्यावर मन्याड धरणाची बारा नंबर पाटचारी जवळ वेगात असलेल्या वाहनाला नियंत्रणात ठेवणे अवघड होते. गेल्या काही महिन्यापूर्वी मुस्लिम समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी जाणार्या बारा ते पंधरा गाडया याच ठिकाणी एकाच दिवशी पलटी झाल्याने वळण रस्त्याबाबतपुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१३५ कोटीचे काम संथगतीने
या रस्त्यांचे काम करण्यासाठी १३५ कोटींच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे या रस्त्यांवर तातडीने करावयाची दुरुस्ती प्रलंबित समस्या ठरते आहे. नादुरूस्त साईड पट्टया अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. हायब्रीड अन्यूइटी अंतर्गत हे काम नाशिक विभागाच्या अखत्यारित आहे. बारा मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तर गावाजवळच्या रस्त्यासाठी दोन्ही बाजूला एक मीटर रुंद काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. मात्र सद्यस्थितीत हे काम अपेक्षित पद्धतीने होत नाही, अशी तक्रार या भागात दिसून आली आहे.
दिशादर्शक फलक लावावे
या गंभीर वळणांवर बर्याच ठिकाणी दिशादर्शक फलक , रिफ्लेक्टर खांब, कॅट आईज रिफ्लेक्टर, मोठमोठे गतिरोधक तयार करणे यासारख्या काही उपाययोजना केल्या तर भविष्यात होणारे अपघात यांना आळा बसणार आहे. या रस्त्यांची दुर्दशा झाली असून किरकोळ दुरुस्ती तातडीने केल्या जाव्यात अशी मागणी आडगाव सरपंच रावसाहेब पाटील यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलताना सांगितले. मालेगाव ते चाळीसगांव दरम्यान सुरू असलेल्या एकशे पस्तीस कोटींच्या कामात या परिसरातील वळण रस्त्यांची रुंदी वाढवून ही गंभीर वळणांची समस्या मार्गी लावावी. तूर्तास हा रस्ता आजवर शेकडो नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरतो आहे.