देवळी येथे एकास मारहाण: मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

चाळीसगाव: तालुक्यातील देवळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत बायकोचा उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही म्हणून एकास मारहाण करून दुखापत केल्याची घटना 28 फेब्रुवारी रोजी 4:30 वाजताच्या सुमारास घडली होती. याबाबत सोमवारी, 8 मार्च रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सविस्तर असे, तालुक्यातील देवळी येथील तेलाराम पांडुरंग पाटील (वय-40) हे आपल्या आई गुमानबाई पाटील, पत्नी रेखाबाई पाटील, मुलगी कु. शितल व मुलगा महेश परिवारासह वास्तव्यास आहेत. मात्र, 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास तेलाराम पाटील हा आपल्या घरात असताना अनिल भास्कर पाटील व यशवंत माणिक पाटील हे दोघेही घरासमोर येऊन तेलाराम बाहेर ये सांगून रवींद्र माणिक पाटील, यशवंत माणिक पाटील, अनिल भास्कर पाटील, रवींद्र नारायण पाटील व जिभाऊ रवींद्र पाटील आदींनी ग्रामपंचायत निवडणुकीत ‘तु बायकोचा उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही’ म्हणून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. बायको रेखा पाटील हे मध्ये सोडवायला गेल्या असता त्यांनाही धक्का-बुकी करत गळ्यातील पोत तोडून नुकसान पोहोचविला.

या वादात तेलाराम पांडुरंग पाटील यांना जबर दुखापत झाली. त्यामुळे उपचारासाठी चाळीसगाव येथील निरामय हॉस्पिटलात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील दवाखान्यात 1 मार्च ते 4 मार्चपर्यंत उपचार घेण्यात आले. 4 मार्च रोजी सायंकाळी तेलाराम पाटील यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आले. त्यामुळे रवींद्र माणिक पाटील, यशवंत माणिक पाटील, अनिल भास्कर पाटील, रवींद्र नारायण पाटील व जिभाऊ रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात तेलाराम पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.