देवस्थानच्या जमीन विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

0

महसूल कायदयात तरतूद करणार; विधानसभेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई :- राज्यातील देवस्थानच्या जमिनींना विक्रीची परवानगी देण्याचे धर्मादाय आयुक्तांना अधिकार आहे. असे असले तरी या जमिनींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक करण्यासाठी महसूल कायदयात तरतूद करणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली.

नगर जिल्हयातील पारनेर तालुक्यात असलेले ढवळापूरी येथील लक्ष्मीनारायण देव विष्णू मंदिर हे नाव कमी करून १३७ एकर जमिनीचा करार तयार करून जमीन बेकायदेशीररित्या विक्री केली. या संदर्भात विधानसभा सदस्य विजय औटी यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले ब्रिटीश कालावधीत देवस्थानला दिलेल्या जमीनींची विक्री करता येणार नाही, असा कायदा आहे. ढवळापूरी येथील देवस्थानच्या जमिनी विक्री केल्यानंतर फेरफारच्या नोंदी घेण्याचे थांबविण्यात आले आहे. धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली असल्यामुळे या संदर्भात केवळ उच्च न्यायालयात दाद मागावी लागते. तथापि, जमिनी विक्री प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून विभागीय आयुक्तांमार्फत एका महिन्यात जमीन विक्रीची चौकशी केली जाईल. या प्रकरणावरून राज्यातील देवस्थानाच्या जमीनी विक्री परवानगी देण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना असलेतरी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक करण्यासाठी महसूल कायदयात तरतूद केली जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.