मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
निलेश झालटे, नागपूर – राज्यातील देवस्थानांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाने मंदिरे ताब्यात घेतली आहेत. सर्व मंदिरे आणि देवस्थाने ताब्यात घेण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. शासनाने शिर्डी देवस्थान ताब्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार थांबला आहे. वक्फ मंडळाच्या अंतर्गत मशिदी येत असल्याने त्या मशिदी शासन कब्ज्यात घेऊ शकत नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. ‘सुयोग’ पत्रकारांच्या निवासस्थानी पत्रकारांची अनौपचारिक भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
शासनाने शिर्डी, सिद्धीविनायक, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर आदी देवस्थानांचे सरकारीकरण केल्यानंतर तेथे प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. मंदिरे कब्ज्यात घेऊन मंदिरांच्या संपत्तीवर शासनाचा डोळा का आहे ? मशिदी आणि चर्च यांचीही संपत्ती भरपूर असून त्यांना परदेशातून भरपूर पैसा मिळतो. त्यामुळे मशिदी आणि चर्च शासन कह्यात घेऊन त्यांतील पैसा विकास कामे करण्यासाठी का वापरला जात नाही ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला होता.
हे देखील वाचा
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंदिर सरकारीकरण कायद्याच्या अंतर्गत मंदिरांची नोंदणी आहे. वक्फ मंडळाच्या अंतर्गत मशिदी आहेत. मशिदी ही खाजगी संपत्ती न मानता वक्फ मंडळाची संपत्ती मानली जाते. वक्फ मंडळाचे व्यवस्थापन पहाणारे दुसरे असले, तरीही वक्फ मंडळाच्या कायद्याच्या अंतर्गत मशिदींची संपत्ती मानली जाते. त्यामुळे वक्फमंडळ आम्ही ताब्यात घेऊ शकत नाही. राज्यातील सर्व मंदिरे ताब्यात घेण्याचा आमचा कोणताही विचार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि, शासनाने शिर्डी मंदिर कह्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार थांबला. शनि शिंगणापूरमध्ये मंदिर कब्ज्यात घेण्याचा आम्ही निर्णय घेतल्यानंतर हळूहळू तेथील वाहने आणि मालमत्ता यांची नोंदणी होऊ लागली. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर
भक्त येऊन त्या ठिकाणी पैसा देतात, त्या पैशाचा अपव्यय होऊ नये, तो भाविक अथवा समाज यांच्या कामाला आला पाहिजे, या भूमिकेतून शासनाने मंदिरे कह्यात घेतली आहेत.
या वेळी शिर्डी देवस्थानाने नाशिक येथील कुंभ मेळासाठी ६६ लक्ष रुपयांच्या साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केला आहे, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याचे उत्तर देणे टाळले. ते म्हणाले की, पंढरपूर येथे प्रतिवर्षी मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करू देणार नाही, असे शेतकरी म्हणत असले, तरी ती ‘फॅशन’ झाली आहे. त्यामुळे याकडे मी लक्ष देत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.