कांगडा : हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. तुम्ही देव आणि राक्षसांच्या युद्धाच्या कहाण्या ऐकल्याच असतील. देव जेव्हाही चांगले काम करायला जायचे. तेव्हा राक्षस त्यात विघ्न आणायचे आणि नंतर पराभूतही व्हायचे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेस म्हणजे ‘लाफिंग क्लब’ असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंवरही निशाना साधला. नेहरूंचे सरकार असताना जनसंघाची स्थापना झाली. तेव्हा जनसंघाला मुळासकट उपटून फेकू असे नेहरू म्हणायचे. त्यामुळे आज आम्ही काँग्रेस मुक्त भारत करायला निघालो आहोत, असा घणाघात मोदींनी केला.
काँग्रेसने आत्मचिंतन करावे
1) चुकीच्या हेतूने केलेल्या कामाला जनता माफी देत नाही. जनतेला संधी मिळताच ते साफसफाई करू लागले आहेत. काँग्रेसला देशातील जनता शिक्षा का देत आहे. यावर काँग्रेसने आत्मचिंतन करावे, असा सल्ला मोदींनी दिला.
2) पूर्वी काँग्रेस महात्मा गांधींची म्हणून ओळखली जायची. आता ती काँग्रेस राहिली नाही. आता काँग्रेस सडक्या विचाराचा नमुना बनली आहे. त्यामुळे सडक्या विचारांपासून देशाला मुक्त करण्यासाठी आम्ही जनजागरण करत आहोत. म्हणूनच काँग्रेस मुक्त भारत करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत, असेही मोदी यांनी सांगितले.
शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर हल्लाबोल
नवी दिल्ली : भाजपचे खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला आहे. एक वकील अर्थव्यवस्थेवर बोलू शकतो. एक टीव्ही अभिनेत्री मनुष्यबळ विकास मंत्री बनू शकते आणि एक चहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही? असा बोचरा सवाल सिन्हा यांनी केला आहे.मी भाजपवर टीका करत नाही. तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने भाजपला आरसा दाखवतोय, असा टोलाही त्यांनी हाणला.