देवांनाही महाराजांनी देवत्त्व प्राप्त करून दिलं..!

0

आम्हास श्री शंभूने राज्य दिले आहे. आमचा देव आम्हाला देतो, आमचा देव आमच्या पाठीशी राहतो, आमचा देव आमच्या हातून त्याला हव्या असलेल्या गोष्टी करून घेतो, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आपल्याला आईभवानी तुळजामाता प्रसन्न आहे व शंभू महादेव आपल्यावर प्रसन्न आहे. याचे गारुड उभे करण्याचा, लोकांवर प्रभाव पाडण्याचा निश्‍चित भाग नव्हता. लोकांच्या मनातून उतरलेल्या देवांना, मुसलमानांनी तोडून-फोडून उद्ध्वस्त केलेल्या देवांच्या देवत्वाला महाराज पुन्हा प्रस्थापित करत होते. एकाचवेळी माणसाला आणि देवालाही प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा शिवाजी महाराजांचा प्रयत्न होता. शिवचरित्र माणसांच्या अचेतन देहातही प्राण फुंकते. शिवचरित्राच्या या शिल्पातून उद्याचा महाराष्ट्र घडायला हवा.

धारणाद्धर्म इत्याहु: धर्मो धारयते प्रजा: समाजाचे धारण-पोषण करणे, समाजाच्या योगक्षेत्राची चिंता वाहणे, समाजाला सामर्थ्य, ऐश्‍वर्य, स्थैर्य प्राप्त करून देणे, समाजाला आत्मरक्षणार्थ सतत सज्ज, जागृत ठेवणे हे धर्माचे काम आहे. 1001 साली गझनीचा महंमद अटक ओलांडून हिंदुस्थानात आला. त्याने हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, एवढेच नव्हे, संपूर्ण हिंदू जनता यांचा संपूर्ण नायनाट करण्याच्या एक महाभयंकर पर्वाची सुरुवात केली. त्याने हिंदूंच्या श्रद्धांना धुळीला मिळवण्यासाठी नगरकोट, स्थानेश्‍वर, मथुरा, कनोज, सोमनाथ अशी देवळे एकापाठोपाठ लुटली. तिथल्या देवांच्या मूर्ती फोडल्या. लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या. लाखो बायका भ्रष्ट केल्या. लाखो मुलांना बाटवले. तुमचा देव तुमच्या साहाय्याला येत नाही. तुमचा धर्म तुमचे रक्षण करू शकत नाही, हे त्याने हिंदूंच्या मनावर अनंत अत्याचाराद्वारा बिंबवले आणि महंमदाने सुरू केलेले हे, हिंदूंना हिंदू म्हणून जगू न देण्याचे धोरण त्यानंतरच्या सर्व मुसलमान सत्ताधार्‍यांनी-आक्रमकांनी सातत्याने सुरूच ठेवले आणि हे सगळे घडत असलेले बघूनही तत्कालीन अनेक हिंदू वीरांनी मुसलमानी सत्तेची चाकरी करण्यात, आपल्या देवा-धर्माचा आणि माणसांचाही उच्छेद करण्यात धन्यता मानली.
यादव-चालुक्य-होयसळ-बल्लाळ यांची दक्षिणेतली समर्थ राज्ये पंधरा वर्षांत धुळीला मिळवणारा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर हा मूळचा हिंदू होता. तो गुलाम होता. पण त्याचा पराक्रम गुलामगिरी मानणारा नव्हता. निजामशाहीचा संस्थापक निजाम उल्मुक बहिरी हाही मूळचा हिंदू. गुजरात राज्याचा संस्थापक मुजफ्फर खान मूळचा हिंदू, इमादशाहीचा संस्थापक फत्तेउल्ला, फिरोजशहाचा वजीर मुक्बुल खान, जहांगिरचा सेनापती महाबतखान हे सर्व मूळचे हिंदू. पण राजा बनण्याचा हक्क त्यांना त्यांचा धर्म देऊ शकत नव्हता. त्यांनी परधर्म स्वीकारून तो मिळवला. शिवाजी महाराजांनाही राज्याभिषेक करून राजा होऊ देण्याला विरोध झाला होता, ही या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आठवणे अपरिहार्य आहे.
ज्यांनी आजपर्यंत देवाधर्माच्या नावाखाली आपल्याला राखीव कुरणे आखून घेतली, ज्या धर्मात आपण आहोत त्या धर्माचे ग्रंथसुद्धा वाचण्याचा अधिकार नाही अशी अजब बंधने ज्यांनी इतरांवर लादली आणि सर्वच दृष्ट्या आपले जीवनमान उंचावून घेतले. माणसाचे कर्तृत्व कणाकणाने फुलते. असे कर्तृत्व फुलवण्यासाठी वातावरण निर्माण करणे, प्रोत्साहन देणे आणि जरूर तेवढी मदत करणे हे कर्तव्य न बजावता उलट फुलणारे कर्तृत्व कसे करपून जाईल याचाच जे विचार करतात, त्यांच्याकडून समरसता साधण्याची शक्यताच नाही. शिवाजी महाराजांनी कर्तृत्व फुलवले. त्यांना जगायचे कशासाठी, मरायचे कशासाठी हे शिकवले आणि मुख्य म्हणजे देवांनाही शिवाजी महाराजांनी पुन्हा देवत्व प्राप्त करून दिले. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे, असे दादाजी नरसी प्रभूंना लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज लिहितात. हे राज्य व्हावे असे आमच्या मनात फार आहे, असे त्यांना लिहिता आले असते, पण आपल्या कार्यामागे देव आहे, नव्हे देवाच्या इच्छेनेच हे सारे होते आहे. देवच माझ्याकडून करून घेतो आहे, असं म्हणत एक एक पराक्रम करत शिवाजी महाराजांनी स्वतःबद्दल आणि देवाबद्दलही विश्‍वासार्हता निर्माण केली. शिवाजी महाराज स्वतःला राजा म्हणवून घेऊ लागले ही गोष्ट त्या काळच्या अनेक खानदानी मंडळींना आवडली नाही. तेव्हाही शिवाजी महाराजांनी, आपण देवाच्याच कृपेने राजा झालो, असे सांगून आपल्या मागे देवाचे आणि देवाच्या मागे आपले सामर्थ्य उभे केले. आमचा देवही आम्हाला देतो, आमचा देव आमच्या पाठीशी राहतो, आमचा देव आमच्या हातून त्याला हव्या असलेल्या गोष्टी करून घेतो, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आपल्याला आईभवानी तुळजामाता प्रसन्न आहे व शंभू महादेव आपल्यावर प्रसन्न आहे. याचे गारुड उभे करण्याचा, लोकांवर प्रभाव पाडण्याचा निश्‍चित भाग नव्हता. लोकांच्या मनातून उतरलेल्या देवांना, मुसलमानांनी तोडून-फोडून उद्ध्वस्त केलेल्या देवांच्या देवत्वाला महाराज पुन्हा प्रस्थापित करत होते. एकाचवेळी माणसाला आणि देवालाही प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा शिवाजी महाराजांचा प्रयत्न होता. या शिवस्मारकातून ही स्फूर्ती आपल्याला मिळाली तर सुराज्य निर्माण व्हायला कोणता उशीर लागेल?

प्रभंजन – हरीश केंची
9422310609