मुंबई – राज्यभरात अनेक ठिकाणी देव-देवता, महापुरुष आणि गड-किल्ल्यांच्या नावाचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या दृष्टीने विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात कायदा आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन राज्य उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.
अमरसिंह पंडित यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यभरात अनेक ठिकाणी देव-देवता, महापुरुष आणि गड-किल्ल्यांच्या नावाचा वापर बियरबार, परमिट रूम, मांसाहारी खानावळ, लोकनाट्य कला केंद्र तसेच देशी दारू विक्री केंद्रांना नावे देण्यासाठी करण्यात येत असून त्यांच्या नावांचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
देवी-देवता व महापुरूषांच्या नावाचा यासाठी वापर करणे, हे चुकीचे आहे. मात्र, यासंदर्भात सध्या कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. यासाठी कामगार विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग मिळून हा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. गुमास्ता आणि कामगार कायद्याअंतर्गत हा विषय येत असल्यामुळे तातडीने यावर बंधन टाकता येणार नाही. मात्र याबाबत कामगार विभाग, उत्पादन शुल्क विभाग तसेच दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची बैठक घेण्यात येईल. विधि आणि न्याय विभागाचे मत मागवून कायदा तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कायदा करताना हा विषय बियर बारपुरता मर्यादित असावा अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. देवाची नावे व्यक्तींनाही दिलेली असतात आणि दुकानांची नावे व्यक्तीच्या नावावरूनही दिली जातात. त्यामुळे कायदा करताना सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर ,टीचर्स अशा विदेशी मद्याच्या नावाला बंदी घालण्याबाबतची मागणीही या चर्चेदरम्यान करण्यात आली. भाई गिरकर, डॉ. नीलम गोऱ्हे, रामहरी रूपनवर यांनी चर्चेत भाग घेतला.