मुंबई । राज्यभरात अनेक ठिकाणी देवी-देवता, महापुरुष आणि गड-किल्ल्यांच्या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारच्यावतीने कडक पावले उचलली जाणार असून, यासाठी कायदा करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यभरात अनेक ठिकाणी महापुरुष आणि गड-किल्ल्यांच्या नावाचा वापर बियरबार, परमिट रुम, मांसाहारी खानावळ, लोकनाट्य कला केंद्र तसेच देशी दारू विक्री केंद्रांना नावे देण्यात येतात. या ठिकाणी देवी-देवतांच्या नावांचाही गैरवापर होत असल्याची लक्षवेधी विधानपरिषद सदस्य अमरसिंह पंडित यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना बावनकुळे बोलत होते. देवी-देवता आणि महापुरुषांच्या नावाचा वापर करणे हे चुकीचे आहे. यासंदर्भात कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. कामगार विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग मिळून हा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.