देवेंद्र नगरात अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी

0

जळगाव । घरात उकाडा जाणवायला लागल्याने घरातील मंडळी रात्री झोपण्यासाठी गच्चीवर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचे दरवाजा तोडून घरात घुसून सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना देवेंद्र नगरात आज सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंद पोलीसांनी चोरीचा पंचनामा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यमुनाबाई अशोक विसपूते (वय-53) रा. प्लॉट नं.27, देवेंद्र नगर ह्या मुलगी रत्ना राजेंद्र थोरात आणि नातू सुजित राजेंद्र थोरात सह दोन लहान नातींसह राहतात.

सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घटना उघडकीस
सध्या पावसाळ्यापुर्वी मोठ्याप्रमाणावर उकाळा जाणवत असल्याने घराच्या लोखंडी दरवाजाला कुलूप लावून सर्वजण रात्री गच्चीवर झोपण्यासाठी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास गेले. त्यानंतर मध्यरात्री 12 ते सकाळी 5.30 पुर्वी अज्ञात चोरट्यांनी टॉमीच्या मदतीने कुलूप तोडून आत घरात प्रवेश करून घरातील पत्र्याचे कपाट उघडून सामान अस्तव्यस्त करत कपाटातील ठेवलेले चांदीचे दोन कॉईन, आठभाराचे दोन जोडवे, सोन्याचे सहा मनी असो एकुण अंदाजे 6 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी फिरण्यासाठी यमुनाबाई अशोक विस्पूते ह्या गच्चीवरून 5.30 वाजता खाली आल्या त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुलगी व नातवाला झोपेतून उठवून सर्व हकिकत सांगितली. याबाबत रामानंद पोलीसांनी कळविल्यानंतर रामानंद पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करण्यात आला.