देवेंद्र फडणवीसांनी मांडला शिवसेनेचा ‘हिशोब’

हे कोणतं ठाकरे सरकार, राष्ट्रवादी फक्त त्यांचा मुखवटा वापरतंय

मुंबई : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, वाझे नाही असे म्हणत शिवसेना पक्षाकडे जी खाती त्यावर झालेला खर्च ५४ हजार कोटी, काँग्रेसकडे जी खाती आहेत त्यावर १ लाख १ हजार कोटी, राष्ट्रवादीकडे जी खाती आहेत त्यावरचा खर्च २ लाख २३ हजार कोटी झाला आहे. सर्वाधिक पैसा हा राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांकडे आला आहे. शिवसेनेला ५० हजार कोटींत गुंडाळले, काँग्रेसला खिरापत दिली लाखाची, आणि जोरात चालू आहे यांचं दुकान, असा आरोप फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. हे कोणतं ठाकरे सरकार, हे राष्ट्रवादीचं सरकार, ठाकरेंचा मुखवटा ते वापरताहेत अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाविकास आघाडीचे सरकार हे प्रचंड भ्रष्टाचारात गुंतलेले आहे. सरकारमधल्या भ्रष्टाचारावरून आपापसातच जुंपली आहे. नाना पटोलेंनी यावर पत्र लिहिले आहे. त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. नाना पटोले हुशार आहेत. मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना हो ना असे म्हणत फडणवीस म्हणाले की, एकीकडे ऊर्जामंत्र्यांवर वार आणि दुसरीकडे खनिकर्म म्हणजे देसाईंवर वार केला. परंतू, तो दगडच इतका हळू मारला की तो त्यांच्याच अंगावर पडल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.