‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजवर गुन्हा

0

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेजचे संचलन करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभागाच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी फिर्याद दिली आहे.

पेजच्या संचालकावर कारवाई व्हावी
देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेजमुळे ज्येष्ठे नेते, तसेच पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून, पुन्हा दंगा भडकण्याची शक्यता असल्याचे चाकणकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पेजच्या संचालकांविरोधात कडक कारवाई व्हावी यासाठी पक्षाचे नेते विकास दांगट, काका चव्हाण, बाळासाहेब कापरे, अक्रूर कुदळे, भूपेंद्र मोरे, हसीना इनामदार, सुरेखा दमिष्टे, अर्चना हनमघर आदींनी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्याकडे निवेदन दिले आहे. पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राइम यांच्याकडेही तक्रारअर्ज दिला आहे.

छायाचित्रांसह आक्षेपार्ह टिप्पणी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने सुरू असलेल्या या फेसबुक पेजवर कोरेगाव भीमा आणि वढू येथे झालेल्या दोन गटांच्या वादाचा संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचे नाव, तसेच छायाचित्रांचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवर पवार, तसेच इतर नेत्यांबाबत आक्षेपार्ह फोटो, मजकूर प्रसारित केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सुरू असलेल्या सदर फेसबुक पेज चालविणार्‍या व्यक्तीविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.