जत: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सांगलीतील जत येथे प्रचारसभा सुरु आहे. यावेळी अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. रस्ते, सिंचन, उद्योग क्षेत्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठे काम केले असल्याचे सांगत मी देशभरात फिरत आहे मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा सारखा मुख्यमंत्री बघितला नाही असे गौरोद्गार अमित शहांनी काढले.
महाराष्ट्राच्या जनतेसाठी स्वत:ला झोकून देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. मला रात्री १२-१ वाजता फोन येतात, त्यावेळी मला लगेच कळते की हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन असेल असेही अमित शहांनी यावेळी सांगितले.
अमित शहा यांनी जतच्या सभेत पुन्हा ३७० चा मुद्दा उपस्थित करत, कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला केला. ३७० ला कॉंग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला असे सांगत देशाचे तुकडे करण्याचा विचार करणाऱ्यांना तुरुंगात टाकू असा इशारा दिला.
यावेळी अमित शहा यांनी ३७० कलम हटवून सरकारने देशाला एकसंघ केला आहे. देशाला सुरक्षित करण्याचे काम आमच्या सरकारने केला आहे. भारतीय सैनिकांवर हल्ला झाला, त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे काम आपल्या सैन्याने केले, सैन्यांचे मनोगत वाढविण्याचे कार्य या सरकारने केले असल्याचे सांगितले.